नांदेड : दारूचे व्यसन सोडवण्यासाठी निर्धार व्यसनमुक्ती केंद्रात भरती केलेल्या राजेश बेळतकर (वय ४०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १७ दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ केली. परंतु, नातेवाइकांच्या तगाद्यामुळे ११ दिवसांनी २४ एप्रिल रोजी अर्धापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणताही तपास केला नाही की, आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मयत राजेश बेळतकर (रा. व्यंकटेशनगर, भोकर) हे शेतकरी असून, त्यांना अनेक दिवसांपासून दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याचा मार्गावर आला होता. त्यातून आठ वर्षीय मुलगा आणि दहा वर्षीय मुलीच्या शिक्षणासह त्यांच्या जगण्याची आबाळ होऊ लागली. तद्नंतर मयताच्या पत्नी रेखा बेळतकर यांनी पती राजेश यांना १० एप्रिल रोजी निर्धार व्यसनमुक्ती केंद्र, महादेव पिंपळगाव येथे साडेपाच हजार रुपये भरून भरती केले. परंतु त्यानंतर केवळ तीन दिवसांतच त्यांचा मृत्यू झाला.
तब्बल ११ दिवसांनी गुन्हा दाखलमृतदेहाच्या छातीवर जखमेचे व्रण, नाकातून रक्तस्राव आणि डोक्याच्या मागे गाठ दिसून आल्याने मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यानंतरही पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला नाही. तब्बल ११ दिवसांनी गुन्हा दाखल केला. व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक राम अय्यर आणि संकेत अय्यर यांच्यासह स्टाफवर २४ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. परंतु अद्याप कोणाला अटक केली नाही, की कोणाची चौकशी केली नाही. त्यामुळे या प्रकरणात केंद्र चालकांना पोलिसांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप होत आहे.
तीन दिवस खोलीत कोंडून ठेवलेमाझ्या पतीच्या मृत्यूला केंद्रातील लोक जबाबदार आहेत. संसाराला त्रास होऊ नये म्हणून नवऱ्याला केंद्रात विश्वासाने पाठविले; पण तेथील निष्काळजीपणा आणि व्यवस्थेने माझ्या नवऱ्याचा बळी घेतला. त्यांना उलट्या होऊ लागल्या तरी दवाखान्यात नेले नाही. वेळेवर उपचार केले नाही. गावठी पद्धतीने उपचार करून तीन दिवस पतीला एकाच खोलीत कोंडून ठेवले. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. आता किमान आरोपींना पकडून त्यांना शिक्षा तरी द्यावी.- रेखा बेळतकर, मयताची पत्नी