विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:32 IST2025-08-28T20:04:19+5:302025-08-28T20:32:50+5:30

अख्ख्या गावाने मध्यस्थी करून दोघांचे प्रेम प्रकरण मिटविले होते. परंतु लग्नानंतरही ते पुन्हा बहरल्याने मुलीच्या कुटूंबियांनी टोकाचे पाऊल उचलले.

Such is the punishment of love! Married girlfriend and boyfriend first beaten, then murdered; Maharashtra shocked by the incident in Nanded | विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध

विवाहित प्रेयसी आणि प्रियकराची आधी धिंड, नंतर हत्या; नांदेडमधील घटनेने महाराष्ट्र स्तब्ध

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे ऑनर किलिंगची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. विवाहित तरुणी व तिच्या प्रियकराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. यापूर्वी गावातून दोघांची ‘धिंड काढल्याचा’ व्हिडिओ व्हायरल झाला असून संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

बोरजुनी गावातील संजीवनी सुधाकर कमळे (वय १९) हिचा गेल्या वर्षी विवाह झाला होऊन ती गोळेगाव (ता. उमरी) येथे सासरी राहत होती. मात्र, विवाहाआधीच तीचे माहेर असलेल्या बोरजुनी येथील लखन बालाजी भंडारे (वय १७) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही लपून-छपून दोघांच्या भेटीगाठी सुरूच राहिल्या. मुलीच्या आई-वडिलांनी याला प्रखर विरोध केला होता. अख्ख्या गावाने मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचाही प्रयत्न झाला. तरीही त्यांच्या भेटी सुरू राहिल्याने मुलीच्या कुटुंबियांचा राग शिगेला पोहोचला.

सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) दुपारी संजीवनी व लखन गोळेगावात सासरी भेटले. त्यावेळी मुलीच्या सासरच्यांनी दोघांना पकडले व तिच्या वडिलांना गावात बोलावून घेतले. दोघांना गावकऱ्यांसमोर हात बांधून मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर गावभर फिरवत धिंड काढण्यात आली. हा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करण्यात आला आणि तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर संजीवनीचे वडील मारुती लक्ष्मण सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांनी मिळून दोघांना निर्दयपणे ठार केले. मृतदेह जवळच असलेल्या बोरजुनी शिवारातील विहिरीत फेकून दिले.

तिघांना पोलिसांनी केली अटक
सायंकाळी या घटनेची माहिती बाहेर आली आणि गावात खळबळ माजली. मयत लखनच्या वडिलांना बालाजी भंडारे या लखनच्या मित्राकडून याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने उमरी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरून उमरी पोलिसांनी संजीवनीचे वडील मारुती सुरणे, काका माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे या तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी (दि. २६) त्यांना भोकर न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला
मंगळवारी सकाळी दोघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर संजीवनीचा अंत्यसंस्कार गोळेगाव येथे, तर लखनचा अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी बोरजुनी येथे करण्यात आला. अंत्यसंस्कारावेळी गावात हळहळ व्यक्त झाली. या ऑनर किलिंगच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. गावाच्या मानासाठी प्रेमीयुगुलाचा जीव घेतल्याची चर्चा सर्वत्र आहे. विशेष म्हणजे हत्या करण्याआधी गावभर काढण्यात आलेल्या धिंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, समाजमन हादरले आहे.

Web Title: Such is the punishment of love! Married girlfriend and boyfriend first beaten, then murdered; Maharashtra shocked by the incident in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.