जिद्दी! विद्यापीठाचा गोंधळ, कौटुंबिक अडचणीवर मात; तब्बल ३७ वर्षानंतर आयुर्वेद पदवीला प्रवेश

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: February 15, 2024 05:45 PM2024-02-15T17:45:41+5:302024-02-15T17:46:09+5:30

कौटुंबिक अडचणी, विद्यापीठ बदलल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग यावर मात करत नांदेडच्या प्रदीप भुजंगराव घाटे यांना तब्बल ३७ वर्षे प्रवेशासाठी

Such courage! After waiting for 37 years, got admission to Ayurveda degree! | जिद्दी! विद्यापीठाचा गोंधळ, कौटुंबिक अडचणीवर मात; तब्बल ३७ वर्षानंतर आयुर्वेद पदवीला प्रवेश

जिद्दी! विद्यापीठाचा गोंधळ, कौटुंबिक अडचणीवर मात; तब्बल ३७ वर्षानंतर आयुर्वेद पदवीला प्रवेश

नांदेड : आयुर्वेद महाविद्यालयात १९८५ साली पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाल्यानंतर दोन वर्षे शिक्षण घेतले. पण, तिसऱ्या वर्षी विद्यापीठ बदलल्याने एका विद्यार्थ्याला तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. आता तब्बल ३७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर याच विद्यार्थ्याला तृतीय वर्षाच्या प्रवेशाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे.

शिक्षणाची जिद्द, मध्यंतरीच्या काळात आलेल्या कौटुंबिक अडचणी, विद्यापीठ बदलल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग यावर मात करत नांदेडच्या प्रदीप भुजंगराव घाटे यांना तब्बल ३७ वर्षे प्रवेशासाठी वाट पाहावी लागली. प्रदीप घाटे हे १९८५ साली नांदेडच्या आयुर्वेद महाविद्यालयात एससी प्रवर्गातून आयुर्वेदाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पात्र ठरले. सुरुवातीचे दोन वर्षे त्यांनी यशस्वीपणे या महाविद्यालयात शिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. मात्र त्यानंतर बदललेले विद्यापीठ, आयुर्वेद विद्यापीठाकडून येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांना तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. तरीही आयुर्वेदाची पदवी मिळवायचीच ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. आता त्यांना उर्वरित तीन वर्षांसाठी म्हणजे तब्बल ३७ वर्षांनंतर आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

अधिष्ठाताने प्रवेश घेण्याचा दिला आदेश
पारंपरिक विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमित करून त्याबाबतची नोंदणी करण्याचा व प्रवेश घेण्याचा आदेश शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता वैद्य वाय. आर. पाटील यांनी जारी केला आहे. यासाठीचे नियमित शुल्क भरण्याच्या सूचनाही करून प्रवेश पूर्ण करून घेण्याबाबत आदेशित केले आहे.

३७ वर्षांच्या खंडानंतरही शिकण्याची जिद्द कायम
प्रवेश मिळण्यासाठी ३७ वर्षांचा कालखंड लागला असला तरी आपण आपली जिद्द सोडली नाही. सातत्याने यात येणाऱ्या अनंत अडचणी, तांत्रिक मुद्दे, कायदेशीर बाबी यांची पूर्तता करून अर्थवट राहिलेला आयुर्वेदाचा पदवी अभ्यासक्रम आता पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे. अधिष्ठाता वाय. आर. पाटील यांनी केलेल्या सहकार्यामुळे बी. ए. एम. एस. पूर्ण करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. प्रदीप भुजंगराव घाटे यांनी सातत्याने निराश न होता केलेल्या पाठपुराव्याबद्दल सुनील टिप्परसे यांनी त्यांचा सत्कार केला.

Web Title: Such courage! After waiting for 37 years, got admission to Ayurveda degree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.