नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र पक्षांचीही घेराबंदी

By शिवराज बिचेवार | Updated: November 13, 2025 18:47 IST2025-11-13T18:46:39+5:302025-11-13T18:47:41+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून खासदार अशोक चव्हाण विरुद्ध सर्व असाच सामना सध्या तरी पहावयास मिळत आहे.

Strategy to create a dilemma for Ashokrao Chavan in Nanded; All parties, including allies, are under siege | नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र पक्षांचीही घेराबंदी

नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांची कोंडी करण्याची रणनीती; विरोधकांसह मित्र पक्षांचीही घेराबंदी

- शिवराज बिचेवार

नांदेड : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा निवडून आल्या. त्यानंतर आपुसकच जिल्ह्यातील भाजपाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे गेले. परंतु त्यानंतर महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चव्हाणांनाच आपला क्रमांक एकच शत्रू ठरवित आरोपांची राळ उठविली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, उबाठा अन् वंचित बहुजन आघाडीच्या तर चव्हाण अगोदरपासूनच निशाण्यावर आहेत. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून चव्हाण विरुद्ध सर्व असाच सामना सध्या तरी पहावयास मिळत आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक गळ्यात गळे घालून लढलेल्या महायुतीत मात्र त्यानंतर मिठाचा खडा पडला. शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर यांनी अशोकराव चव्हाणांवर सडकून टीका केली. तर अनेक वर्षांचे राजकीय वैर संपवून भाजपात मांडीला मांडी लावून बसलेले प्रतापराव चिखलीकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार झाल्यानंतर त्यांनी ही शत्रुत्व अजून संपले नसल्याचे दाखवित चव्हाणांवर टीकेची एकही संधी सोडली नाही. दोन्ही मित्र पक्षातील नेत्यांकडून विखारी टीका होत असताना चव्हाणांनी मात्र संयमीपणे त्यांचे आरोप खोडून काढले. तर दुसरीकडे काँग्रेसनेही चव्हाणांविरोधात वेगळी आघाडी उघडून आरोपांचा माराच सुरूच ठेवला होता. परंतु त्याची धार काहीशी बोथट होती.

एकीकडे युतीची भाषा तर दुसरीकडे विखारी टीका
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे घोडे अडलेले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रतापराव चिखलीकर हे युती करण्यास आमची तयारी असल्याचे सांगत असले तरी, त्याच वेळी ते चव्हाण हे जिल्ह्यासाठी व्हिलन असल्याचे विखारी टीकाही करीत आहेत. त्या तुलनेत भाजपाकडून मात्र राज्यात युती असल्यामुळे संयम बाळगण्याचे मवाळ प्रतिउत्तर दिल्या गेल्या.

घेराबंदी करण्याचा प्रयत्न
महायुतीतील नेत्यांमध्ये असे घमासान सुरू असताना आता काँग्रेसने वंचितशी आघाडी केली आहे. आणखी काही मित्र पक्ष जोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. त्यासाठी सेक्यूलर मतांचे विभाजन होऊ नये असा दावा केला जात आहे. त्यामुळे युती असो की आघाडी सगळीकडूनच खासदार चव्हाणांची घेराबंदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला किती यश मिळते अन् चव्हाण पुन्हा एकदा सर्वांना पुरून उरतात काय हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Strategy to create a dilemma for Ashokrao Chavan in Nanded; All parties, including allies, are under siege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.