Nanded: कुटुंबियांच्या भेटीस आलेल्या जवानाचा कार अपघातात मृत्यू; मुले वाट पाहत राहिले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:13 IST2026-01-13T13:12:33+5:302026-01-13T13:13:38+5:30
नुकतीच त्यांची जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती.

Nanded: कुटुंबियांच्या भेटीस आलेल्या जवानाचा कार अपघातात मृत्यू; मुले वाट पाहत राहिले...
वन्नाळी : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या शहापूर येथील जवानाचा कार अपघातात मृत्यू झाला. ही घटना १० जानेवारी रोजी घडली. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. निधनाचे वृत्त कळताच शहापूर गावावर शोककळा पसरली.
प्रभाकर भूमरेड्डी मुस्कावार हे पंजाब येथील युनिट क्रमांक ३७, राष्ट्रीय रायफल्स (आर्मी क्र.२५४१५४६ एफ ) रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर होते. नुकतीच त्यांची जम्मू-काश्मीर येथे बदली झाली होती. मकर संक्रांतनिमित्त ते शहापूर येथे आले होते. आई-वडिलांना भेटून शहापूर ते सुजायतपूरमार्गे कार (क्र. एएन ०१ एल ८२१९) ने उदगीर येथे शिक्षणासाठी असलेल्या मुलांना भेटण्यासाठी जात होते. कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या कारला अपघात झाला. अपघातानंतर त्यांना नागरिकांच्या मदतीने लगेचच देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तपासणीअंती डॉ. प्रसाद नुनेवार यांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत झाल्याचे घोषित केले.
त्यांच्या पार्थिवावर आमदार जितेश अंतापूरकर, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, संभाजीनगर छावणी मुख्यालयाचे श्रीकांता मलिक, हवालदार एस. एस. कोतवाल, कॅप्टन प्रकाश कस्तुरे, कॅप्टन कपाळे, सैनिकी विद्यालयाचे संतोष कलेवाड, सैनिकी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर डुमणे, सरपंच संगीता भंडारे, माजी. जि.प. सदस्य शिवाजी कनकंटे, मलरेड्डी यलावार, माजी सैनिक मारुती भासवडे आदींच्या उपस्थितीत पोलिस प्रशासन व सैन्य दलाच्या वतीने शासकीय इतमामात शहापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.