Rabi season will be Happy; The Upper Mannar Limboti will offer three turns of water for farmers | रबी हंगाम होणार सुखाचा; अप्पर मानार लिंबोटीची शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने देणार
रबी हंगाम होणार सुखाचा; अप्पर मानार लिंबोटीची शेतकऱ्यांसाठी तीन आवर्तने देणार

ठळक मुद्देलिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे.शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर 

कंधार (जि. नांदेड) : कंधार व लोहा तालुक्यातील रबी हंगामाचा शिवार हिरवा होण्यास अप्पर मानार लिंबोटी प्रकल्प पर्वणी ठरणार आहे. लोहा येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय झाला असून, याचा  या दोन तालुक्यातील ६ हजार हेक्टरवरील शेतीला फायदा होणार आहे. 

अप्पर मानार प्रकल्प निर्माण करण्यामागे हरित शेतीची संकल्पना होती. परंतु शेतीपेक्षा प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला. त्यातूनच शेजारच्या तालुक्यापेक्षा दूरच्या तालुक्यात पाणी नेण्याचा प्रयत्न सुरू झाला. यातून संघर्ष उभा राहू लागला. उदगीर शहराला व पालमसह अनेक गावांना या  प्रकल्पातील पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व जनतेत नाराजी आहे. लिंबोटी प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी लोहा तहसील कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.  

या बैठकीत रबी हंगामाकरिता ३ आवर्तन पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. लिंबोटी प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ही १०७ .९८६ दलघमी आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ३० गावातील ६ हजार हे.शेती सिंचनासाठी फायद होतो. यंदा प्रकल्प तुडुंब आहे. त्यामुळे कंधार तालुक्यातील बोरी, घोडज, गंगनबीड, बाबुळगाव, बाळांतवाडी, पानभोसी, चिखलभोसी या ७ गावांना तर  लोहा तालुक्यातील २३ गावाची रबीची शेती बहरण्यासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. पहिले पाणी डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवडयात देण्यात येणार आहे.त्यामुळे लोहा व कंधार तालुक्यातील ६ हजार हेक्टर जमिन रबी हंगामाने बहरणार आहे.याचा लाभ दोन्ही तालुक्यातील ३० गावांना होणार आहे. पाण्याची स्थिती पाहून उपलब्ध जलसाठा यावरून उन्हाळी हंगाम पाण्याचा विचार केला जाणार असल्याचे समजते.

बारूळ प्रकल्पातील आवर्तन कधी?
निम्न मानार प्रकल्प बारूळची पाणी साठवण क्षमता  १४६.९२ दलघमी आहे. कंधार, नायगाव व बिलोली तालुक्यातील ९९ गावांतील २३ हजार ३१० हेक्टर शेती सिंचन या प्रकल्पामुळे होते. कंधार तालुक्यातील ३८ गावे, बिलोली १२ व नायगावमधील ४९ गावांतील शेतीला याचा फायदा होतो; परंतु अद्याप कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त लागला नाही. त्यामुळे पाणी कधी मिळणार, हा प्रश्र आहे. 

शेलगाव वितरिकेची चाचणी  डिसेंबरअखेर 
५८ कि.मी. डाव्या कालव्यातून पाणी लोहा व कंधार तालुक्यांतील  ३० गावांना दिले जाते. त्यात शेलगाव वितरिकेचे चाचणीचे काम होणे गरजेचे होते. याची चाचणी डिसेंबरअखेर होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचे समजते. 

Web Title: Rabi season will be Happy; The Upper Mannar Limboti will offer three turns of water for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.