Parbhani MPs threatened with death; Nanded's infamous Rinda's terror in Parbhani | परभणीच्या खासदारांना जीवे मारण्याची धमकी; नांदेडच्या कुख्यात रिंदाची परभणीत दहशत

परभणीच्या खासदारांना जीवे मारण्याची धमकी; नांदेडच्या कुख्यात रिंदाची परभणीत दहशत

ठळक मुद्देखंडणी देण्यास नकार देणाऱ्या अनेकांच्या पायावरही त्याच्या गँगमधील सदस्यांनी गोळ्या चालविल्या आहेत. परभणीच्या खासदारांची दोन कोटींची सुपारी घेतल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

नांदेड : शहरात तीन वर्षांपासून खंडणी, धमकी आणि गोळीबाराच्या घटनांतील मुख्य सूत्रधार असलेला कुख्यात हरविंदरसिंघ रिंदा याची आता परभणीतही दहशत पसरली आहे. परभणीचे खा. बंडू जाधव यांची दोन कोटींची सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे नांदेड पोलीस हादरले असून, परभणीसह नांदेड पोलीसही या प्रकरणाचा तपास करीत आहे. 

नांदेडात कौटुंबिक वादातून रिंदाने माळी कुटुंबीयांवर हल्ला केला होता. त्यात माळी परिवारातील सदस्यांसह अनेकांचा बळी गेला आहे. दिवसाढवळ्या मुख्य वस्ती, बाजारपेठेत गोळीबार करून दहशत पसरवायची. त्यानंतर व्यापारी, डॉक्टर, बिल्डर यांना फोन करुन जिवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळायची, अशी रिंदाची पद्धत होती. खंडणी देण्यास नकार देणाऱ्या अनेकांच्या पायावरही त्याच्या गँगमधील सदस्यांनी गोळ्या चालविल्या आहेत. यात काँग्रेसचे नेते गोविंद कोकुलवार यांचाही समावेश होता.  तत्कालीन पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या कार्यकाळात या टोळीला बराच आवर घालण्यात आला होता.  मात्र, आता परभणीच्या खासदारांची दोन कोटींची सुपारी घेतल्याचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे रिंदाने नांदेडबाहेरही जम बसविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. त्यामुळे नांदेड पोलिसांनी लक्ष घातले.

नांदेडात एक ताब्यात; परभणीत चौकशी समिती
खा. बंडू जाधव यांनी जिवे मारण्याचा कट रचल्याची तक्रार दिली. या प्रकरणात परभणी पोलिसांनी समिती स्थापन केली आहे. यात पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या नियंत्रणात पोनि कुंदनकुमार वाघमारे, प्रवीण मोरे यांची संयुक्त समिती नेमली आहे. तसेच नांदेड पोलिसांनी खा. जाधव प्रकरणात बुधवारी अमरावती येथून सागर वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू असून, या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. या तपासामुळे दोन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Parbhani MPs threatened with death; Nanded's infamous Rinda's terror in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.