गुरुजी तुम्ही सुद्धा! पाण्यातून गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:38 IST2025-02-13T15:37:45+5:302025-02-13T15:38:44+5:30

मुख्याध्यापकाच्या अत्याचाराने अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती; नांदेडमध्ये नेऊन केला गर्भपात

On the pretext of showing off the police academy, the principal raped the student by giving him a sedative in the water | गुरुजी तुम्ही सुद्धा! पाण्यातून गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

गुरुजी तुम्ही सुद्धा! पाण्यातून गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

नांदेड : पोलिस अकॅडमी दाखवितो, म्हणून कारमध्ये विद्यार्थिनीला तामसा येथून घेऊन निघालेल्या मुख्याध्यापकाने पिण्याच्या पाण्यात गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर, या अत्याचाराच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेक वेळा अत्याचार करीत पीडितेला गर्भवती केले. ही बाब कुटुंबीयांना समजल्यानंतर या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी तामसावासीयांनी कडकडीत बंद पाळला. 

पीडित मुलीचे आईवडील हे एका शिक्षकाच्या शेतात राहतात, तर पीडित मुलगी ही इयत्ता दहावीत असून, ती शिक्षणासाठी तामसा येथील मामाकडे राहत होती. शाळेतील मुख्याध्यापक राजूसिंह चौहान हा जे विद्यार्थी इंग्रजीत कच्चे आहेत, त्यांच्यासाठी वेगळा वर्ग घेत असे. त्यातून मुख्याध्यापक चौहान आणि पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख झाली, तसेच पुढे चौहान याचे पीडितेच्या वडिलांशी बोलणेही वाढले. पीडितेला पोलिस बनून आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा होता, ही बाब मुख्याध्यापक चौहान याला समजल्यानंतर त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगून नांदेडला पोलिस अकॅडमी पाहण्यासाठी घेऊन जातो, असे सांगितले. पीडितेच्या आई-वडिलांनीही मुख्याध्यापकावर विश्वास ठेवत जाण्यास परवानगी दिली. त्यानंतर, नोव्हेंबर २०२४ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत मुख्याध्यापक चौहान हा आपल्या चारचाकीत विद्यार्थिनीला घेऊन नांदेडला निघाला होता. सोबत अन्य मुली असल्याचे त्याने पीडितेला सांगितले होते, परंतु कुणीही आले नाही. तामसा रस्त्यावर एका ठिकाणी कार थांबवून चौहान याने गुंगीचे औषध मिसळलेले पाणी पीडितेला पिण्यासाठी दिले. त्यामुळे विद्यार्थिनीची शुद्ध हरपली अन् चौहान याने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर येताच पीडितेला ही बाब समजली, यावेळी चौहान याने तुझा व्हिडीओ काढला असून, तो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने याबाबत कुठेच वाच्यता केली नाही. त्यानंतर, चौहान याने काही दिवसांनंतर पुन्हा पीडितेला शाळा सुटल्यानंतर तामसा बस स्थानक परिसरात असलेल्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी पीडितेने कोणता व्हिडीओ आहे, याबाबत विचारणा केली असताना, चौहान याने व्हिडीओ दाखविला नाही. त्यानंतरही अनेक वेळा चौहान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला. त्यात पीडिता गर्भवती राहिली. ही बाब चौहान याला समजल्यानंतर नांदेडातील एका रुग्णालयात आणून तिचा गर्भपात करण्यात आला. १० फेब्रुवारी राेजी पीडितेचे मामा तिला नेण्यासाठी गावात आले असताना पीडितेच्या आईने चौकशी केली. त्यानंतर, पीडितेने आपबिती सांगितली. या प्रकरणात तामसा पोलिस ठाण्यात मुख्याध्यापक राजूसिंह चौहान याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित शाळा राजकीय व्यक्तीची
गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्याध्यापक विद्यार्थिनीवर अत्याचार करीत होता. त्यात काही दिवसांपूर्वीच ही बाब उघडकीस आली, परंतु संबंधित शाळा ही राजकीय पुढाऱ्याशी संबंधित असल्यामुळे कारवाईसाठी चालढकल करण्यात येत होती. शेवटी बुधवारी पहाटे या प्रकरणात गुन्हा नोंद झाला.

नांदेडात केला गर्भपात
मुख्याध्यापकाने अत्याचार केल्याने विद्यार्थिनी गर्भवती झाली होती. ही बाब तिने मुख्याध्यापकाला सांगितली. अगोदर त्याने त्याच्याजवळील गोळी दिली, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही. म्हणून तिला कारमध्ये बसवून नांदेडात आणण्यात आले होते. या ठिकाणी एका रुग्णालयात तिचा गर्भपात करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थिनीचा गर्भपात नेमका कोणत्या रुग्णालयात झाला, याचाही पोलिसांकडून आता तपास सुरू आहे.

Web Title: On the pretext of showing off the police academy, the principal raped the student by giving him a sedative in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.