not suitable role of Telangana regarding the water of Babhali Dam | बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

ठळक मुद्देमुख्यमंत्री, सचिवांच्या पत्रांना उत्तर देईनात दीडशे टीएमसी पाणी समुद्रात

- अनुराग पोवळे

नांदेड : पोचमपाड धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिल्यानंतरही बाभळी बंधाऱ्यात केवळ २.७४ टीएमसी पाणी अडवू देण्याबाबत तेलंगणा सरकारने अडेलतट्टू भूमिका घेतली  आहे.  राज्याच्या सचिवांनी आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राला तेलंगणा सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. या भूमिकेतून बाभळी बंधाऱ्याबाबतचा तेलंगणाचा आकस कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील सर्वच बंधारे, धरणे परतीच्या पावसाने भरल्याने गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तिकडे तेलंगणातील पोचमवाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे दोन्ही राज्याच्या संमतीने बाभळीचे दरवाजे २९ आॅक्टोबरपूर्वीच बंद करण्याबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करण्यात येईल अशी भूमिका पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतली होती. याबाबत चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  पाठपुरावा केला. 

महाराष्ट्राच्या सचिवांनी तेलंगणा राज्याच्या सचिवांना २० दिवसापूर्वी याबाबत एक पत्र लिहिले. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी स्वत: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना पत्र लिहिले. मात्र त्यांच्या पत्रालाही प्रतिसाद दिला नाही.  नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांनीही याविषयात निझामाबाद जिल्हा प्रशासनासह तेलंगणा सरकारशी पत्रव्यवहार केला होता. धर्माबाद तालुक्यातील बाभळी येथे २९ आॅक्टोबर २०१४ रोजी पूर्ण झालेल्या २.७४ टीएमसी क्षमतेच्या या बंधाऱ्याच्या वादात सर्वोच न्यायालयाने १ जुलै रोजी बंधाऱ्याचे दरवाजे उघडावेत आणि २९ आॅक्टोबर रोजी दरवाजे बंद करावेत असा निर्णय दिला आहे. 

५ हजार ५०० दलघमीपाणी तेलंगणात
मराठवाड्यातील जायकवाडीसह सर्वच प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे आतापर्यंत विष्णूपुरी प्रकल्पातून ५ हजार ५०० दलघमीहून अधिक पाणी तेलंगणात सोडले. हे पाणी थेट निझामाबाद जिल्ह्यातील पोचमपाड  धरणात पोहोचते. पोचमपाड धरणही १०० टक्के भरल्याने या धरणातून दीडशे टीएमसी पाणी समुद्रात सोडून दिले आहे. मात्र, बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे. 

Web Title: not suitable role of Telangana regarding the water of Babhali Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.