शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन
By प्रसाद आर्वीकर | Updated: March 2, 2024 16:34 IST2024-03-02T16:32:35+5:302024-03-02T16:34:10+5:30
शेतीवरचे कर्ज कसे फेडायचे, ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत संपवले जीवन

शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन
हदगाव : शेतीमध्ये कर्जबाजारी होत असल्याने आणि हॉटेलचा व्यवसाय चालत नसल्याने नैराश्यात असलेल्या एका शेतकऱ्याने स्वतःच्या हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास भोकर येथे घडली आहे.
सचिन वानखेडे (२८, रा. शिवणी) असे आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील शिवनी येथील सचिन वानखेडे यांनी शेतीमध्ये उत्पन्न होत नसल्याने जोडव्यवसाय म्हणून भोकर येथे कॅफे नाइन नावाचे हॉटेल सुरू केले. आधीच शेतीवर बँकेचे कर्ज, खासगी कर्ज होते. त्यात पुन्हा हॉटेलसाठी कर्ज घेतले. कर्ज घेऊन सुरू केलेल्या हॉटेलचा व्यवसायही चांगला चालत नव्हता. किराया वाढत होता.
त्यामुळे शेतीवरचे कर्ज कसे फेडायचे, ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता सचिन यांना सतावत होती. त्याच चिंतेतून १ मार्च रोजी सायंकाळी भोकर येथील हॉटेलमध्येच सचिन वानखेडे यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. २ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शिवनी येथे सचिन वानखेडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ, भावजई असा परिवार आहे.