नांदेड : गोवा-नांदेड-नागपूर विमानसेवेला प्रारंभ झाला असून त्यास प्रवाशांकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता नांदेड-तिरुपती व नांदेड-मुंबई या नवीन विमानसेवेसाठी डीजीसीएने हिरवा कंदील दिला असून लवकरच धार्मिक व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी शहरे विमानसेवेने जोडली जाणार आहेत.
नांदेडकरांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरत असून बहुप्रतिक्षित गोवा-नांदेड-नागपूर विमानसेवेचा शुभारंभ ३१ मार्च रोजी झाला. पहिल्या दिवशी गोव्याहून आलेले विमान नांदेड येथे दाखल झाले, तर परतीच्या प्रवासात ४१ प्रवाशांनी गोव्याकडे उड्डाण करत या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या अनेक महिन्यांपासून नांदेड-गोवा विमानसेवेची मागणी प्रलंबित होती. लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्टार एअर कंपनीने प्रस्ताव सादर केला आणि नागरी उड्डयन मंत्रालय तसेच डीजीसीएने या मार्गास मंजुरी दिली. या सेवेमुळे नांदेड थेट गोव्याशी जोडले गेले असून राज्याची उपराजधानी नागपूर हेदेखील या मार्गावर समाविष्ट झाल्याने प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
दरम्यान, लवकरच तिरुपती आणि मुंबई या महत्त्वाच्या शहरांसाठीही विमानसेवा सुरू होणार आहे. धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे तिरुपती आणि आर्थिक राजधानी मुंबई या शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित होणार असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सध्या नांदेड शहर दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, नागपूर आणि मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. या नव्या विमानसेवेमुळे जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने नांदेडकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात या सेवांना अधिक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Summary : Nanded gets flight connectivity boost! After Goa, Nagpur, flights to Mumbai, Tirupati approved. A boon for pilgrims, business travelers; Nanded connected to major cities.
Web Summary : नांदेड़ को उड़ान कनेक्टिविटी बढ़ावा! गोवा, नागपुर के बाद मुंबई, तिरुपति के लिए उड़ानें स्वीकृत। तीर्थयात्रियों, व्यापार यात्रियों के लिए वरदान; नांदेड़ प्रमुख शहरों से जुड़ा।