नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:41 IST2025-11-03T16:39:43+5:302025-11-03T16:41:54+5:30
विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाणाऱ्या गाड्या चुकतात.

नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबईत जाण्यास कायम उशीर; कनेक्टिंग गाड्या चुकल्याने आर्थिक फटका!
नांदेड : बल्लारशाह, आदिलाबाद ते मुंबई दादरदरम्यान दररोज धावणारी नंदिग्राम एक्स्प्रेस ही गाडी वेळेवर पोहोचत नसल्याने प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नांदेडहून ही गाडी दररोज संध्याकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी मुंबई दादर येथे पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही गाडी अनेकदा २५ ते ३० मिनिटांनी उशिराने दादर स्थानकात पोहोचत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या विलंबामुळे विदर्भ व मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाणाऱ्या गाड्या चुकतात. विशेषतः डहाणू, पनवेल, नवी मुंबई तसेच गुजरातकडे जाणाऱ्यांना वेळेवर कनेक्टिंग गाड्या मिळत नाहीत. परिणामी, आरक्षित तिकिटांवर पाणी सोडावे लागते, आर्थिक नुकसान होते आणि प्रवाशांचा वेळ वाया जातो. मुंबईसारख्या ‘घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या’ शहरात हा विलंब प्रवाशांसाठी मानसिक व शारीरिक त्रासदायक ठरत आहे.
विद्यार्थ्यांपासून महिला, शासकीय कर्मचारी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या उशिराचा फटका बसत आहे. रविवार, २ नोव्हेंबर रोजीही नंदिग्राम एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिरा दादर स्थानकात पोहोचली. या सततच्या विलंबामुळे त्रस्त झालेल्या थडीसावळी (ता. बिलोली) येथील प्रवासी तसेच मुंबईत कार्यरत मराठवाडा मित्रमंडळाचे सदस्य दर्शन भंडारे यांनी दादर रेल्वे प्रबंधकांकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. भविष्यात रेल्वे प्रशासनाने या गाडीचा विलंब टाळून प्रवाशांना वेळेवर सेवा मिळावी, अशी मागणी भंडारे यांनी केली आहे.