Nanded: पुरातही कर्तव्य सोडले नाही; थर्माकोलचा आधार घेऊन शिक्षक पोहोचले ध्वजारोहणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:51 IST2025-09-17T17:49:24+5:302025-09-17T17:51:17+5:30
'अहो, सुट्टी मारायला जमणार नाही आणि पोहताही येईना...'पुरामुळे मार्ग बंद, तरीही गावकऱ्यांनी शिक्षकांना झेंडावंदनासाठी सुखरूप पोहोचवले, हदगाव तालुक्यातील मनुला गावाची घटना

Nanded: पुरातही कर्तव्य सोडले नाही; थर्माकोलचा आधार घेऊन शिक्षक पोहोचले ध्वजारोहणाला
हदगाव: हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील एका शिक्षकाने दाखवलेल्या कर्तव्यानिष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटलेला असतानाही, या शिक्षकाने स्थानिक मासेमारांच्या मदतीने थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार करून शाळा गाठली.
हदगाव तालुक्यातील तळणी केंद्रातील मनुला खु. हे गाव पैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णपणे वेढले गेले होते. गावाकडे जाण्याचा रस्ता पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला होता. अशा परिस्थितीत हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन करण्यासाठी शिक्षकांना पोहोचणे आवश्यक होते. मात्र, एका शिक्षकासमोर मोठी अडचण उभी राहिली.
या शिक्षकावर यापूर्वी दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि त्यांना अर्धांगवायुचा त्रास आहे. त्यामुळे, पुराच्या पाण्यातून जाणे त्यांच्यासाठी धोकादायक होते. सुट्टी मारणे त्यांना शक्य नव्हते आणि पोहताही येत नव्हते, त्यामुळे त्यांची मोठी तारांबळ उडाली. 'निवृत्त होण्यासाठी फक्त एक-दोन वर्षे शिल्लक असताना माझ्यावर ही जीवघेणी परिस्थिती का आली?' अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
'अहो, सुट्टी मारायला जमणार नाही आणि पोहताही येईना...'पुरामुळे मार्ग बंद, तरीही गावकऱ्यांनी शिक्षकांना झेंडावंदनासाठी सुखरूप पोहोचवले, हदगाव तालुक्यातील मनुला गावाची घटना #Rain#nanded#MarathwadaMuktiSangramDinpic.twitter.com/PYJUraffhk
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) September 17, 2025
गावकऱ्यांनी दिला मदतीचा हात
शिक्षक अडचणीत असल्याचे लक्षात येताच स्थानिक प्रशासनाने आणि मासेमारी करणाऱ्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. मासेमार व्यावसायिक भोई यांनी शिक्षकांसाठी थर्माकोलचा एक तराफा उपलब्ध करून दिला. त्यांच्यासोबत मासेमारांचा एक सदस्यही देण्यात आला. या तराफ्याच्या मदतीने शिक्षकांनी पुराची नदी यशस्वीरित्या पार केली. अखेर, ते शाळेत सुखरूप पोहोचले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण केला.