Nanded:लोह्यात मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर संशयास्पद रंगांची उधळण; जादूटोणा की दुसरे काही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:12 IST2025-08-22T13:09:51+5:302025-08-22T13:12:02+5:30

नगर परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव; सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी सुपूर्द

Nanded: Suspicious colors splashed on the chief officer's chair; Suspicion of witchcraft creates a stir in Loha Municipality | Nanded:लोह्यात मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर संशयास्पद रंगांची उधळण; जादूटोणा की दुसरे काही?

Nanded:लोह्यात मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर संशयास्पद रंगांची उधळण; जादूटोणा की दुसरे काही?

- गोविंद कदम
लोहा :
लोहा नगरपालिकेत जादूटोण्याच्या संशयावरून मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या खुर्चीवर संशयास्पद वस्तु आणि रंगांची उधळण केल्याचे आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकारामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी घाबरले असून मागे जादूटोणाचा प्रकार असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

आज सकाळी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना चेंबरमधील त्यांच्या खुर्चीवर काहीतरी संशयास्पद रंगांची उधळण केल्याचे निदर्शनास आले. मुख्याधिकारी लाळगे यांनी याबाबत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे याबाबत विचारपूस केली. मात्र, या प्रकाराची माहिती कोणालाच नव्हती. या धक्कादायक घटनेनंतर मुख्याधिकारी लाळगे यांनी तत्काळ लोहा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेजसुद्धा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांकडून आता सीसीटीव्ही फुटेजची सखोल छाननी सुरू असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिली.

दरम्यान, या घटनेमुळे नगर परिषदेतील कर्मचारी व अधिकारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीवर संशयास्पद वस्तु आणि रंग टाकल्याची वार्ता समजताच नागरिकांमध्ये देखील चर्चांना उधाण आले असून, नेमके काय व का घडले याची उत्सुकता आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई करणार असल्याचे समजते आहे.

अंधश्रद्धेला बळी पडू नका; ही खुर्चीची विटंबना
लोहा नगरपरिषद कार्यालयात घडलेल्या प्रकाराबाबत मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "ही घटना अंधश्रद्धा व जादूटोणाशी संबंधित नसून खुर्चीची केलेली विटंबना आहे, हे संबंधित व्हिडिओ व छायाचित्रांमधून स्पष्ट दिसून येते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता बाळगू नये."ते पुढे म्हणाले की, "मुख्याधिकारी म्हणून मी सदैव अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. अंधश्रद्धेला बळी न पडता आपण सर्वांनी प्रशासनिक कामकाज नियमित सुरू ठेवावे."
- श्रीकांत लाळगे, मुख्याधिकारी, न.प.लोहा

Web Title: Nanded: Suspicious colors splashed on the chief officer's chair; Suspicion of witchcraft creates a stir in Loha Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.