Nanded: मासेमारी सुरू करताच अचानक वादळी वारा सुटला, एकजण तलावात बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:24 IST2025-05-06T18:24:23+5:302025-05-06T18:24:53+5:30
२४ तास उलटूनही अद्याप मासेमाराचा शोध लागला नाही; कंधार तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील घटना

Nanded: मासेमारी सुरू करताच अचानक वादळी वारा सुटला, एकजण तलावात बेपत्ता
कंधार/दिग्रस खुर्द (नांदेड) : मासेमारी करण्यासाठी गेलेले भिमराव संभाजी सोनकांबळे हे अचानक वादळ वारा आल्याने तलावात बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता दिग्रस खुर्द येथे घडली. तलावाच्या बाजूला कपडे, मोबाईल, चप्पल, मासेमारीचे जाळे आढळून आले आहे. यावरून सोमवारी रात्री आणि आज सकाळपासून तलावात शोधकार्य सुरू असून २४ तास उलटूनही अद्याप यश आले नाही.
तालुक्यातील दिग्रस खुर्द येथील भिमराव संभाजी सोनकांबळे (५०) हे गावाच्या जवळ असलेल्या तलावामध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास छोटीशी होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी उतरले होते. मात्र, त्यादरम्यान सोसाट्याचा वारा सुटून जोरदार वादळीवारे वाहू लागले. वातावरण शांत झाल्यानंतर एका शेतकऱ्यास तलावाच्या बाजूला कपडे, मोबाईल, चप्पल, मासेमारीचे जाळे आढळून आले. मात्र, तलावात कोणीच नव्हते. शेतकऱ्याने याची माहिती गावात दिली. त्यानंतर सोनकांबळे यांच्या नातेवाइकांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या जवळ आढळून आलेल्या वास्तूवरून सोनकांबळे तलावात बुडाले असल्याचा संशय नातेवाईकांना आला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री अंधार असल्याने शोधकार्य करता आले नाही.
२४ तास उलटूनही शोध सुरूच
दरम्यान, आज, मंगळवारी सकाळपासून नवरंगपुरा येथील मासेमारी करणाऱ्यांनी तलावात शोधकार्य सुरू केले. मात्र, अद्याप यश प्राप्त झाले नाही. उपविभागीय अधिकारी पोलीस कंधार यांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. साडेतीन वाजेच्या सुमारास मुखेडवरून आलेले मासेमारी करणारे काहीजण शोधकार्य करत असल्याची माहिती माजी सरपंच सत्यजित सोनकांबळे यांनी दिली. तब्बल २४ तास उलटूनही सोनकांबळे यांचा शोध लागला नसल्याने नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी विविध विभागाच्या अधिकारी यांनीही भेट दिली.