नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 11:39 IST2025-12-25T11:39:27+5:302025-12-25T11:39:27+5:30
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच रात्री संपूर्ण कुटुंब संपलं

नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
मुदखेड (नांदेड): मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार (बारड सर्कल) येथे माणुसकीला चटका लावणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांसह दोन तरुण मुलांनी सामूहिक आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी (दि. २४) रात्री ही घटना घडली असून, या मृत्यूकांडाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
घरात आई-बाप, रुळावर मुलं! मिळालेल्या माहितीनुसार, रमेश लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई लखे हे दोघेही राहत्या घरात बाजेवर मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, त्यांची दोन तरुण मुलं - उमेश आणि गोविंद यांनी गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. एकाच वेळी कुटुंबातील चारही आधारस्तंभ कोसळल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मृत्यूचे गूढ कायम; फॉरेन्सिक टीम पाचारण
या सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरची परिस्थिती हलाखीची होती की आणखी काही कौटुंबिक कारण होते, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. "आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले असून मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून तपासानंतरच सत्य समोर येईल," असे मंठाळे यांनी सांगितले.
गावावर शोककळा
अल्पभूधारक असूनही कष्टाने संसाराचा गाडा ओढणाऱ्या लखे कुटुंबाचा असा शेवट होईल, अशी कल्पनाही ग्रामस्थांनी केली नव्हती. तरुण मुलांच्या जाण्याने आणि आई-वडिलांच्या संशयास्पद मृत्यूने जवळा मुरार परिसरात स्मशानशांतता पसरली आहे.