Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 18:43 IST2025-08-29T18:41:15+5:302025-08-29T18:43:56+5:30

पाण्याचा अंदाज न आल्याने मिना नाल्यातून जाताना पुरात वाहून गेले. 

Nanded: Rain havoc; Body of station master washed away in flood near Umri found! | Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला!

Nanded: पावसाचा कहर; उमरीजवळ पुरात वाहून गेलेल्या स्टेशन मास्तरचा मृतदेह सापडला!

उमरी (नांदेड) : ड्यूटी संपून घराकडे जात असलेल्या बोळसा ( ता. उमरी) येथील रेल्वे स्टेशन मास्टरचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओमप्रकाश शिवलाल मीना ( ४०) असे मृत स्टेशन मास्तरचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

ओमप्रकाश शिवलाल मीना हे उमरी जवळील बोळसा रेल्वेस्टेशन येथे स्टेशन मास्टर म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्री ड्युटी संपवून मीना हे स्टेशनहून निघाले. त्यांनी गाडी स्टेशनपासून दूर बोळसा गावात लावली होती. त्यामुळे स्टेशनपासून चालतच ते निघाले. मात्र, यावेळी वाटेतील नाल्याला पूर आला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने मिना नाल्यातून जाताना पुरात वाहून गेले. 

दरम्यान, बराच वेळ झाला तरी आपले पती घरी आले नाहीत. म्हणून मिना यांच्या पत्नीने मोबाईलवर कॉल केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. काहीवेळाने पत्नीने बोळसा रेल्वे स्थानकांवरील इतर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली. मिना यांनी स्टेशन सोडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच लागलीच कर्मचाऱ्यांनी मिना यांचा शोध सुरू केला. यावेळी जवळच्या नाल्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांना दिली.  उमरी पोलीस स्टेशनचे बीट जमादार सुनील कोलबुद्धे , अरविंद हैबतकर , आकाश जाधव आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. रात्री एक वाजताच्या सुमारास स्टेशन मास्टर मीना यांचा मृतदेह उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. 

राजस्थानमध्ये होणार अंत्यविधी
शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी मीना यांचा मृतदेह त्यांचे मूळ गाव असलेल्या राजस्थान राज्यात ॲम्बुलन्सने रवाना करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी उमरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Nanded: Rain havoc; Body of station master washed away in flood near Umri found!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.