नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिकीट तपासणी महसुलामध्ये उल्लेखनीय टप्पा गाठत आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. रेल्वेगाड्या व स्थानकांवर वर्षभर राबविण्यात आलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमांमधून विभागाने एकूण १४.९५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे मुख्यालयाने या वर्षासाठी १४.८० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, जे विभागाने आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन दिवस आधीच म्हणजेच २८ मार्च २०२६ रोजी पूर्ण केले आहे.
विभागाची ही चालू वर्षातील कामगिरी मागील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये नोंदवलेल्या १२.५९ कोटी रुपयांच्या सर्वोत्तम महसुलापेक्षाही लक्षणीयरीत्या अधिक असून ती तिकीट तपासणी कार्यक्षमतेत झालेली मोठी वाढ दर्शवते. या यशस्वी वाटचालीत विभागाने काही महत्त्वाचे विक्रमही प्रस्थापित केले असून, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी एकाच दिवसात १०.९० लाख रुपयांचा सर्वाधिक महसूल जमा झाला होता, तर ऑक्टोबर २०२५ या एकाच महिन्यात १.५५ कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली होती. विनातिकीट आणि अनियमित प्रवासावर प्रभावी नियंत्रण मिळवून रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यात तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. विशेष तिकीट तपासणी मोहिमा, सातत्यपूर्ण देखरेख आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण यामुळे नांदेड रेल्वे विभागाला हा उल्लेखनीय टप्पा गाठता आला आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले यांनी या ऐतिहासिक यशाबद्दल वाणिज्य विभाग आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. भारतीय रेल्वेचा महसूल वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.