Nanded: 'शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात'; संतप्त शेतकऱ्याने मुदखेड तहसिलदारांची गाडी फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:02 IST2025-10-27T15:01:37+5:302025-10-27T15:02:16+5:30
दिवाळी होवूनही अनेकांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली.

Nanded: 'शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात'; संतप्त शेतकऱ्याने मुदखेड तहसिलदारांची गाडी फोडली
नांदेड: अतिवृष्टी आणि महापूरामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. हजारो शेतकऱ्यांची दिवाळीही अंधारात गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी मुदखेड तहसिलदारांची गाडी फोडली. यावेळी जय जवान जय किसान अशा घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सलग अतिवृष्टी आणि महापूरामुळे जवळपास सहा लाख हेक्टरवरील पीके मातीमोल झाली आहेत. हजारो पशूधन पूराच्या पाण्यात मृत्यूमुखी पडले आहे. अनेकांच्या जमिनी अक्षरक्ष: खरवडून गेल्या आहेत. त्यात शासनाने ३१ हजार कोटींच्या नुकसान भरपाईची घोषणा करीत ती दिवाळीपूर्वी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दिवाळी होवूनही अनेकांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम आलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. त्या संतापातून वासरी येथील एक शेतकरी फावडे घेवूनच मुदखेड तहसिल कार्यालयाच्या आवारात आला होता. यावेळी जय जवान जय किसान अशा घोषणा देत या शेतकर्याने तहसिलदारांची गाडी फोडली.
शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट! 'जय जवान, जय किसान'च्या घोषणा देत नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये तहसिलदारांची गाडी फोडली #nanded#marathwadarainpic.twitter.com/bCnZBdCeFj
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) October 27, 2025
शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटला
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली असताना अधिकारी मात्र मलिदा खातात असा संतापही या शेतकऱ्याने व्यक्त केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मोठा गोंधळ उडाला होता. सदरील शेतकऱ्याला आता पेालिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, नुकसान भरपाईची रक्कम वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा बांध सुटत चालला आहे हेच या घटनेवरुन स्पष्ट होते.