अर्धापुरात नदीत तरंगताना आढळला मृतदेह; घातपात की अपघात? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:15 IST2026-02-26T16:12:12+5:302026-02-26T16:15:00+5:30
अर्धापुरात खळबळ! नदीपात्रात आढळला अज्ञात मृतदेह; पिवळा शर्ट अन् काळी पॅन्ट, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अर्धापुरात नदीत तरंगताना आढळला मृतदेह; घातपात की अपघात? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
अर्धापूर (नांदेड): अर्धापूर तालुक्यातील देगाव शिवारात गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळगाव ते कारखाना रोडवरील नदीपात्रात ही घटना उघडकीस आली असून, हा मृत्यू घातपात आहे की अपघात, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, देगाव परिसरातील नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मंठाळे, विजय गायकवाड, शिवराज वाडीकर, दत्ता देशमुख आणि पोलीस पाटील रेखा जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची दुर्गंधी सुटलेली असल्याने तो बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.
ओळख पटवण्याचे आवाहन
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, मयताचे वय ४० ते ४५ वर्षे असून, अंगात पिवळ्या रंगाचा (काळे ठिपके असलेला) शर्ट आणि काळी पॅन्ट आहे. उंची अंदाजे ५ फूट आहे.
पोलीस तपासाचे आव्हान
संबंधित व्यक्ती नदीपात्रात कशी पोहोचली? हा घातपात तर नाही ना? या प्रश्नांचे गूढ कायम आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. जर कोणाकडे या वर्णनाच्या व्यक्तीची माहिती असल्यास त्यांनी बारड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.