खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:52 IST2026-03-26T19:52:44+5:302026-03-26T19:52:54+5:30
खासगी ट्रॅव्हल्सचा सुसाट वेग ठरला जीवघेणा! खंडगाव पाटीजवळ भीषण अपघात; मुखेड तालुक्यातील दोन तरुणांचा बळी

खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू
गडगा (जि. नांदेड): मुखेडहून नांदेडकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. नरसी-मुखेड मार्गावरील खंडगाव (बेंद्री) पाटीजवळ २५ मार्च रोजी हा अपघात घडला. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा बुधवारी मध्यरात्री नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जागीच मृत्यू आणि उपचारादरम्यान अंत
मिळालेल्या माहितीनुसार, विकास नारायण गायकांबळे (वय ३२, रा. उमरदरी, ता. मुखेड) हे दुचाकीवरून नरसीकडून उमरदरीकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. या धडकेत विकास यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले ओमप्रकाश नागोराव कोनापुरे (वय ५०, रा. उमरदरी, ता. मुखेड) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नांदेडला हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
खासगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर प्रश्नचिन्ह
मुखेड-नांदेड मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली असते. टप्पा प्रवासी थांब्याला परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून या ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावतात. या बेजबाबदार वेगामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, आरटीओ अधिकाऱ्यांनी अशा ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.