भावी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 19:06 IST2026-03-07T19:05:21+5:302026-03-07T19:06:19+5:30

आकांक्षा गायकवाड आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा, नांदेडमध्ये खळबळ

Nanded: Medical Student Aakanksha Gaikwad Commits Suicide; Case Filed Against NCP State Secretary Jivan Ghogre Under Atrocity Act | भावी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा

भावी डॉक्टरला आत्महत्येस प्रवृत्त केले, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव घोगरे यांच्याविरुद्ध गुन्हा

नांदेड : शहरातील हडको परिसरात वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. वसतिगृहाचे थकीत शुल्क भरण्यासाठी करण्यात येत असलेल्या तगाद्यामुळे आणि कथित मानसिक त्रासामुळे विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून, याप्रकरणी वसतिगृहचालक तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जीवन घोगरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरालगतच्या वाजेगाव येथील रहिवासी आकांक्षा मुंजाजीराव गायकवाड (वय २५) ही हडको येथील पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. ती मागील वर्षभरापासून जीवन घोगरे यांच्या खासगी वसतिगृहात राहत होती. माहितीनुसार, आकांक्षाने मागील दहा महिन्यांपासून वसतिगृहाचे शुल्क भरले नव्हते. थकीत शुल्क भरण्यासाठी घोगरे यांनी तिच्याकडे वारंवार तगादा लावल्याचे तसेच सुमार भाषेत बोलून अपमानित केल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासामुळे नैराश्यात गेलेल्या आकांक्षाने दि. ५ मार्च रोजी वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मात्र, या घटनेमागे आत्महत्या नसून संशयास्पद बाबी असल्याचा आरोप करत नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संबंधितांवर गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार वसतिगृहचालक जीवन घोगरे यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title : भविष्य के डॉक्टर की आत्महत्या: राकांपा नेता पर मामला दर्ज।

Web Summary : नांदेड़ में एक मेडिकल छात्रा ने कथित तौर पर छात्रावास शुल्क के बकाया को लेकर उत्पीड़न के कारण आत्महत्या कर ली। परिवार की शिकायत के बाद छात्रावास के मालिक राकांपा नेता पर मामला दर्ज किया गया।

Web Title : Future doctor suicide: NCP leader booked for abetment, atrocity act.

Web Summary : A medical student in Nanded committed suicide allegedly due to harassment over unpaid hostel fees. An NCP leader, who owns the hostel, is booked for abetment and under the Atrocity Act following family complaints.