Nanded: माहुरच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:10 IST2025-09-30T19:10:22+5:302025-09-30T19:10:48+5:30
अन्य संस्थानांनी देखील मदत करावी; जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे आवाहन

Nanded: माहुरच्या रेणुकादेवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी एक कोटी एक लाख रुपयांची मदत
माहूर (जि.नांदेड): साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या श्री रेणुकादेवी संस्थानने नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्तांना एक कोटी एक लक्ष रुपयाची सहाय्यता केली आहे. इतर धार्मिक संस्थान व सामाजिक संस्था यांनी सुद्धा अशाच प्रकारची सहाय्यता करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज ( दि. ३०) पत्रकार परिषदेतून केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज सकाळी यात्रा नियोजन अंतर्गत केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत लिफ्ट्सह स्कायवॉक, वाहनतळ आणि व्यापारी संकुल हे काम लवकरच पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. अतिवृष्टी बाधित नागरिक व शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रशासन युद्ध स्तरावर काम करीत आहे. असे ते म्हणाले. पुरामुळे नदी व नाला काठची जमीन खरडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्या संदर्भात शासन सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांचे समवेत तहसीलदार अभिजित जगताप, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी विवेक कांदे यांची उपस्थिती होती.