Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:12 IST2025-08-29T20:12:09+5:302025-08-29T20:12:45+5:30
लोहा तालुक्यात सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; जनजीवन विस्कळीत, शेतीचे नुकसान, ८० कुटुंबांचे स्थलांतर
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड) : आज पहाटेच्या मुसळधार पावसाने लोहा शहर व तालुक्यात कहर केला. अचानक झालेल्या पावसामुळे इंद्रानगर, नवी आबादी परिसरातील ७० ते ८० कुटुंबांना तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित करण्यात आले. त्यांच्या निवास-जेवणाची सोय नगरपालिका प्रशासनाने केली आहे.
दरम्यान, शहरातील बुलढाणा अर्बन बँक, विठाई साडी सेंटर, हर्ष सिमेंट एजन्सी, श्रीनिवास इलेक्ट्रॉनिक, श्रावणी जनरल स्टोअर यांसह ७० ते ८० दुकाने पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पूरस्थितीची पाहणी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली. यावेळी तहसीलदार परळीकर, मुख्याधिकारी लाळगे, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी नागरिकांना धीर दिला. नगरपालिका व महसूल प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून अनेक नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस, हळद ही पिके पाण्यात वाहून गेली असून जनावरांचेही नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
लोहा तालुक्यात सहा मंडळांत अतिवृष्टी नोंद:
मंडळ पावसाची नोंद (मिमी)
लोहा १९४
माळाकोळी/सावरगाव २८४
कलंबर १९४
कापसी २६७
सोनखेड १९४
शिवडी १४३