Nanded: रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन, गावकऱ्यांचे रात्रभर जागरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:45 IST2025-11-11T15:40:23+5:302025-11-11T15:45:02+5:30
रविवारी रात्री एका वाहन चालकाने रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडीओ काढला होता.

Nanded: रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन, गावकऱ्यांचे रात्रभर जागरण
नांदेड : रविवारी रात्री लोहा तालुक्यातील वडेपुरी शिवारात रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी बिबट्या आढळून आला होता. या बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. त्यानंतर रात्री १० वाजता वन विभागाचे पथक दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरातील १५ ते २० किलोमीटरमध्ये असलेल्या ग्रामस्थांनी भीतीपोटी रात्रभर जागरण केले. तर वन विभागाच्या पथकांनी बिबट्याचा शोधही घेतला. परंतु तो सापडला नाही.
वर्षभरापूर्वी वडेपुरी शिवारात बिबट्या आढळला होता. त्यानंतर रविवारी रात्री एका वाहन चालकाने रत्नेश्वरी गडाच्या पायथ्याशी अन्नपूर्णा देवी मंदिर परिसरात बिबट्या फिरत असल्याचा व्हिडीओ काढला होता. हा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेची दखल घेत वन विभागाचे पथकही त्याठिकाणी पोहोचले होते. तसेच आजूबाजूच्या गावांत खबरदारीचा उपाय म्हणून दवंडी देण्यात आली होती. तसेच शेतशिवारात कोणीही एकटे फिरू नये, असे आवाहन करण्यात आले हाेते. परंतु या घटनेमुळे परिसरातील गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. दापशेड, रत्नेश्वरी, जानापुरी, हरबळ, टेळकी, किवळा, धनगरवाडी, लोंढेसांगवी आदी गावांतील नागरिकांनी बिबट्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. मात्र, भीतीपोटी या ग्रामस्थांना जागरण करण्याची वेळ आली.