Nanded: अतिवृष्टीने पीक वाहून गेले, त्यात कर्जाचा डोंगर वाढल्याने त्रस्त शेतकऱ्यानं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 12:36 IST2025-09-12T12:36:15+5:302025-09-12T12:36:25+5:30
सायाळ गावात हळहळ; शेतकरी आत्महत्या थांबणार तरी कधी ?

Nanded: अतिवृष्टीने पीक वाहून गेले, त्यात कर्जाचा डोंगर वाढल्याने त्रस्त शेतकऱ्यानं संपवलं जीवन
- गोविंद कदम
लोहा: तालुक्यातील मौजे सायाळ येथे नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर या निराशातून तरुण शेतकरी दिनेश सितलसिंह ठाकूर (वय ३५) यांनी १० सप्टेंबर रोजी जीवन संपविण्याच्या हेतूने विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यांचा ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ठाकूर यांच्या शेतात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे पाणी शिरून पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतजमीनही खरडून गेल्याने मोठे संकट ओढवले. तर दुसरीकडे लोहा तालुक्यातील धावरी शाखेतील एसबीआय बँकेचे कर्ज ठाकूर यांच्या डोक्यावर होते. मात्र, सतत नापिकी व कर्जाचा वाढता डोंगर पाहून शेतकरी ठाकूर निराश होते. यातूनच त्यांनी १० सप्टेंबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. मात्र, त्यांना लागलीच नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा नांदेड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्या अत्यंत दुर्दैवी असून शासनाने आत्महत्याग्रस्त ठाकूर कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी सायळचे सरपंच अण्णाराव पवार यांनी केली आहे.