Nanded: आधी आराम, मग काम; नायगावात कर्मचारी झोपले चक्क साहेबांच्या टेबलवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 19:00 IST2025-10-17T18:59:57+5:302025-10-17T19:00:36+5:30
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात तर कर्मचाऱ्यांची बेजबाबदारी उघडकीस आली आहे.

Nanded: आधी आराम, मग काम; नायगावात कर्मचारी झोपले चक्क साहेबांच्या टेबलवर!
- रामकृष्ण मोरे
देगाव (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांची अवस्था पाहता आओ-जाओ, घर तुम्हारा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पाच दिवसांचा आठवडा असूनही ना अधिकारी वेळेवर हजर राहतात, ना कर्मचारी. त्यामुळे कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा अक्षरशः कंटाळा झाला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात तर कर्मचाऱ्यांची बेजबाबदारी उघडकीस आली आहे. प्रभारी उपअभियंता डी. आय. होनराव यांच्या कार्यालयातच सेवक ठाकूर दुपारच्या वेळेस टेबलावर घोरत झोपलेले दिसले. या प्रकारामुळे हे सरकारी कार्यालय आहे की कोणाचे वैयक्तिक घर? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने नागरिकांची कामे रखडली आहेत. कुणी तक्रार केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते, उलट बेजबाबदार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच पाठबळ मिळते, अशी नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात प्रभारी उपअभियंता डी. आय. होनराव यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सेवक ठाकूर यांची तब्येत ठीक नसल्याने ते आराम करत होते. आमच्याकडे एकच कर्मचारी आहे, असे सांगितले.
दरम्यान, शासकीय कार्यालयातील या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष असून, जबाबदार अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.