Nanded district central bank reopened Mahagadi; Sunil Kadam elected as president | नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा महाआघाडी; अध्यक्षपदी सुनील कदम यांची निवड
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत पुन्हा महाआघाडी; अध्यक्षपदी सुनील कदम यांची निवड

ठळक मुद्दे डॉ. कदम यांना ११ तर भोसीकर यांना ९ मते पडली.  या निवडणुकीत जिल्हा बँकेचे २० संचालक उपस्थित होते.

नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील कदम यांची शनिवारी झालेल्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांनी हरिहरराव भोसीकर यांचा २ मतांनी पराभव केला. डॉ. कदम यांना ११ तर भोसीकर यांना ९ मते पडली. बँकेचे संचालक भास्करराव पाटील खतगावकर या निवड प्रक्रियेवेळी अनुपस्थित होते.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी डॉ. सुनील कदम आणि हरिहरराव भोसीकर यांनी उमेदवारी दाखल केली. दोन्ही उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचेच होते. पण डॉ. कदम यांना महाआघाडीने पाठींबा दिला होता. तर भोसीकर हे काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार होते.  या निवडणुकीत जिल्हा बँकेचे २० संचालक उपस्थित होते. त्यातील ११ संचालकांची मते ही डॉ. कदम यांना मिळाली तर ९ मते भोसीकर यांना मिळाली. या निवडणूक प्रक्रियेवेळी खतगावकर अनुपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी बँकेचे कार्यकारी अधिकारी अजय कदम उपस्थित होते. 

निवडीनंतर डॉ. कदम यांनी मागील निवडणुकीत महाआघाडीला सोडले. ही आपली चूक होती, हे मान्य करत यावेळी ती सुधारल्याचे सांगितले. आगामी काळात खा. चिखलीकर, माजी आ. बापुसाहेब गोरठेकर, आ. नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या विकासासाठी प्रयत्न करु, अशी प्रतिक्रिया दिली. पद्मश्री श्यामराव कदम यांचे सहकार क्षेत्रातील योगदान अमुल्य आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच आपणही वाटचाल करणार असल्याचे ते म्हणाले. खा. चिखलीकर यांनी महाआघाडीने अध्यक्ष निवडीची जबाबदारी आपल्यावर आणि गोरठेकर यांच्यावर सोपवली होती. ती पार पडली. कदम यांच्या रुपाने पद्मश्री श्यामराव कदम यांचा वारसा पुढे आला आहे.  जिल्हा बँकेची परिस्थिती सुधारण्याचा सर्व संचालकांचा प्रयत्न राहील, असे ते म्हणाले. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस ८, भाजप- ६, शिवसेना १, काँग्रेस ५ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. मागील वर्षी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या महायुतीने बँकेवर सत्तेचा झेंडा फडकावित काँग्रेसला बॅकफुटवर लोटले होते. ही सत्ता तीन वर्षे अबाधित राहिली. मात्र चौथ्यावर्षी काँग्रेसने महायुतीत फुट पाडत अध्यक्षपद आघाडीकडे घेतले. त्याचा वचपा महायुतीने आजच्या निवडणुकीत काढला. 
 


Web Title: Nanded district central bank reopened Mahagadi; Sunil Kadam elected as president
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.