Nanded: लोह्यात आभाळ फाटले; लिंबोटी धरणातून विसर्ग वाढला, अनेक घरांत पाणी शिरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:44 IST2025-09-27T10:43:39+5:302025-09-27T10:44:14+5:30
नांदेड - लातूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार तासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे

Nanded: लोह्यात आभाळ फाटले; लिंबोटी धरणातून विसर्ग वाढला, अनेक घरांत पाणी शिरले!
- गोविंद कदम
लोहा ( नांदेड): तालुक्यात पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जणू आभाळच फाटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. उर्ध्व माणार प्रकल्पांतर्गत लिंबोटी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. वाढत्या पाणलोट क्षेत्रामुळे विसर्ग वाढविण्यात आला असून २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता ११ दरवाजे २ मीटर व ४ दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या ८४,६५६.७८ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू असल्याची माहिती प्रकल्प प्रशासनाने दिली.
पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील जुना लोहा व परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या चार तासांपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पुरस्थितीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन लोहा–कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तहसीलदार विठ्ठल परळीकर, लोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे तसेच प्रकल्प प्रशासनाने केले आहे.
स्थानिक प्रशासनाने बचाव व आपत्कालीन पथकांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पुढील विसर्गाबाबत वेळोवेळी निर्णय घेतला जाईल, असे उर्ध्व मानार प्रकल्प अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.