Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:20 IST2025-10-18T15:19:33+5:302025-10-18T15:20:02+5:30
गावात आरोग्य यंत्रणेचा तळ, अनेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले

Nanded: दूषित पाण्यामुळे अनर्थ? चेनापूर तांड्यावर अचानक ११८ जणांना विषबाधा,उपचार सुरू!
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): तालुक्यात मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. चेनापूर तांडा येथील ११८ हून अधिक नागरिकांना विषबाधा झाल्याची माहिती असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुलाब, पोटदुखी आणि अशक्तपणा अशा त्रासांमुळे अनेकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यात लहान मुलांचा समावेश नसल्याने प्रशासनाला थोडा दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास तांड्यावरील नागरिकांना अचानक त्रास सुरू झाला. काहींनी खासगी डॉक्टरांकडून औषधे घेतली, पण रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका प्रशासनाला माहिती दिली. माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा तात्काळ गावात दाखल झाली.
शुक्रवारी सायंकाळी चार वाजल्यापासून आरोग्य विभागाने तांड्यातील १०० हून अधिक घरांची तपासणी सुरू केली. यात ६० महिला आणि ५८ पुरुष अशा एकूण ११८ रुग्णांना विषबाधा झाल्याचे आढळून आले. यापैकी सुमारे १० ते १२ गंभीर रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेने तातडीने अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
पाण्यातून विषबाधेचा संशय
गावकऱ्यांमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे विषबाधा झाली असावी, अशी जोरदार चर्चा आहे. या संदर्भात प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता पाण्याचे नमुने तातडीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील १२३ कुटुंबांमधील ६२४ जणांची तपासणी करण्यात आली असून, सार्वजनिक पाणी स्रोताचे शुद्धीकरणही करण्यात आले आहे.
आमदार-अधिकाऱ्यांनी घेतली धाव
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, यांच्यासह अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने चेनापूर तांड्याला भेट दिली. आमदार चव्हाण यांनी आरोग्य यंत्रणेला संपूर्ण कुटुंबियांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आणि तालुक्यातील सर्व पाणी नमुने तपासण्याची सूचना केली.
'शुद्ध पाण्याचा वापर करा'
डॉ. श्रीकांत देसाई यांनी नागरिकांना शुद्ध पाण्याचा वापर करण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणा गावात अजूनही तळ ठोकून आहे. 'जीव वाचले, हे महत्त्वाचे', अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.