Nanded Crime: भररस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून; तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 14:03 IST2026-04-01T14:01:25+5:302026-04-01T14:03:11+5:30
आधी पानटपरीवर खरेदी केली अन् मग अचानक तरुणावर तुटून पडले; भोसी बस स्थानकावर दिवसाढवळ्या खुनाचा थरार! नक्की काय घडलं?

Nanded Crime: भररस्त्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून; तोंडाला रुमाल बांधून आलेल्या हल्लेखोरांचा थरार
भोकर (जि. नांदेड): तालुक्यातील भोसी येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भोकर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरील भोसी बस स्थानकाजवळ ही घटना घडली. आदिनाथ काशिनाथ डुब्बेवाड (रा. शेंबोली, ता. मुदखेड) असे मृत तरुणाचे नाव असून, या भीषण हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पानटपरीवर खरेदी केली अन् मग केला वार
मिळालेल्या माहितीनुसार, आदिनाथ हा भोसी बस स्थानकाजवळील एका पानटपरीसमोर उभा होता. त्याचवेळी एका मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधलेले दोन अज्ञात तरुण तिथे पोहोचले. आरोपींनी आधी पानटपरीवर काही वस्तूंची खरेदी केली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. त्यानंतर अचानक त्यांनी आदिनाथवर हल्ला केला आणि त्याच्या छातीवर व बरगडीवर धारदार शस्त्राने सुमारे पाच वार केले. आदिनाथ रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला.
उपचारादरम्यान पहाटे प्राणज्योत मालवली
गंभीर जखमी झालेल्या आदिनाथला तातडीने बारड येथील दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि रक्तस्राव जास्त झाल्याने बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे.
आरोपींचा शोध सुरू; तपासाची चक्रे फिरली
भररस्त्यात झालेल्या या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जुन्या वादातून हा प्रकार घडला की यामागे काही दुसरे कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून संशयितांचा माग काढला जात आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.