लोहा तालुक्यातील बोरगावात जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; कुऱ्हाड, चाकू, पाईपने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:07 IST2026-03-10T17:07:23+5:302026-03-10T17:07:36+5:30
बोरगाव येथे भररस्त्यात तुंबळ हाणामारी, दोन्ही बाजूचे सदस्य गंभीर जखमी, परस्परविरोधी गुन्हे दाखल

लोहा तालुक्यातील बोरगावात जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; कुऱ्हाड, चाकू, पाईपने हल्ला
लोहा (जि. नांदेड): तालुक्यातील बोरगाव (आ.) येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना ७ मार्च रोजी घडली. या सशस्त्र हल्ल्यात कुऱ्हाड, लोखंडी पाईप, रॉड आणि चाकूचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांतील अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी दिलेल्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली बाजू: रस्ता अडवून कुऱ्हाडीने वार
पुंडलीकराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमिनीच्या व्यवहाराचा राग मनात धरून विठ्ठल पाटील, नारायण पाटील, राहुल पाटील व साहेब पाटील यांनी त्यांचा रस्ता अडवला. "तुला जिवंत सोडणार नाही" अशी धमकी देत आरोपींनी लोखंडी कुऱ्हाड आणि पाईपने डोक्यावर व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
दुसरी बाजू: चाकूने छातीवर वार करण्याचा प्रयत्न
दुसऱ्या गटातील नारायण पाटील यांनीही प्रतिफिर्याद दिली आहे. ८ मार्च रोजी पुंडलीक पाटील, अजित पाटील, जयश्री पाटील व उद्धव पाटील यांनी जुन्या वादातून शिवीगाळ करत हल्ला केला. यावेळी एका आरोपीने चाकूने छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला असता, हात आडवा केल्याने नारायण पाटील गंभीर जखमी झाले. तसेच लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर प्रहार करण्यात आले.
पोलीस तपास सुरू
या घटनेमुळे बोरगाव परिसरात काही काळ भीतीचे आणि तणावाचे वातावरण होते. पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.