‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 20:47 IST2026-04-06T20:46:57+5:302026-04-06T20:47:43+5:30

पोलिस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची बघ्याची भूमिका!

Nanded Crime, Third murder in 'that' incident in front of police and security guards; Video goes viral | ‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल

‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल


नांदेड: शहरात वर्चस्ववादातून शुक्रवारी (दि. ३) मध्यरात्री तिहेरी हत्याकांड घडले. एकमेकांवर झालेल्या हल्ल्यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या जखमीची शासकीय रुग्णालय परिसरात भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, रुग्णालयातील हत्या पोलिस आणि सुरक्षारक्षकांच्या समोरच घडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

३ एप्रिलच्या मध्यरात्री सुमारे दीड वाजता कॅनॉल रोडवरील ई-स्क्वेअर येथे ‘धुरंधर’ चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अनिल पंजाबीच्या गटातील अर्जितसिंग गजानन चव्हाण आणि त्याच्या दोन साथीदारांवर साईलाला गँगच्या सदस्यांनी खंजीर आणि तलवारीने हल्ला केला. या हल्ल्याचा प्रतिकार करताना अर्जितसिंग व त्याच्या साथीदारांनी पलटवार केला. या चकमकीत महंमद अरबाज महंमद फारूख याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सय्यद आवेज सय्यद खलील गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी मृत व जखमींना शिवाजी पुतळा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, सय्यद आवेज याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात येत होते. आपल्या भावाचा मृत्यू झाल्याचे समजताच अर्जितचा भाऊ प्रदीप आणि वडील गजानन चव्हाण यांनी काही जणांसह रुग्णालय गाठले. रुग्णवाहिका अपघात विभागाबाहेर पोहोचताच प्रदीपने तलवारीने सय्यद आवेजवर पुन्हा हल्ला केला, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

यावेळी उपस्थित पोलिस कर्मचारी आणि रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न न करता बघ्याची भूमिका घेतल्याचे व्हिडिओत दिसून येते. फक्त एकच पोलिस कर्मचारी हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसते. विशेष म्हणजे, रुग्णालयातील बहुतेक सुरक्षारक्षक हे भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले असून, ते शस्त्रसज्ज असतात. तरीदेखील अशी घटना घडत असताना त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, यामुळे सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिस किंवा सुरक्षा विभागाकडून ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक खरोखर सुरक्षित आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
 

Web Title : नांदेड में तिहरा हत्याकांड: पुलिस और गार्ड के सामने तीसरी हत्या; वीडियो वायरल।

Web Summary : नांदेड में गैंगवार में तिहरा हत्याकांड हुआ। दो की मौके पर ही मौत हो गई, और तीसरा अस्पताल में पुलिस और सुरक्षा के सामने मारा गया। वीडियो वायरल होने से सुरक्षा को लेकर गंभीर सवाल उठे।

Web Title : Triple murder in Nanded: Third killing before police, guards; video viral.

Web Summary : In Nanded, a triple murder occurred due to gang rivalry. Two died at the scene, and a third was killed at the hospital in front of police and security. The video went viral, raising serious safety concerns.