नांदेड नगरी भक्तीरसात न्हाली, 'हिंद-दी-चादर' ला उत्साहात प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 07:18 IST2026-01-25T07:17:47+5:302026-01-25T07:18:21+5:30
Nanded News: शीख गुरूंचे शहादत आणि त्याग जगात अद्वितीय आहेत म्हणूनच त्यांच्या जयंती आणि शाहिदी समारंभही वैशिष्ट्यपूर्ण असतात, असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५०व्या शाहिदी समागमानिमित्त शनिवारी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नांदेड नगरी भक्तीरसात न्हाली, 'हिंद-दी-चादर' ला उत्साहात प्रारंभ
नांदेड - शीख गुरूंचे शहादत आणि त्याग जगात अद्वितीय आहेत म्हणूनच त्यांच्या जयंती आणि शाहिदी समारंभही वैशिष्ट्यपूर्ण असतात, असे प्रतिपादन पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केले. ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५०व्या शाहिदी समागमानिमित्त शनिवारी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री मान म्हणाले की, शीख गुरूंनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देण्यास कधीही मागेपुढे पाहिले नाही. 'सबका भला' हा एकमेव भाव त्यांच्या मनात होता. आज जगाला शीख गुरूंच्या त्यागाची तुलना करता येईल, अशी उदाहरणे सापडत नाहीत.
देश आणि धर्मासाठी आपले प्राण अर्पण करणारे असे महापुरुष किती महान असतील, असा प्रश्नही त्यांनी केला. आजही शीख समाजातील जवान देशाच्या संरक्षणासाठी सज्ज आहेत. पंजाबची सीमा असो वा राजस्थान- सर्वत्र शीख सैनिक शत्रूशी ठामपणे मुकाबला करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
संत महंतांसह लाखो भाविकांची मांदियाळी
‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेगबहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहिदी समागम वर्षानिमित्त शनिवारी सकाळी सचखंड गुरुद्वारा येथून नगर कीर्तन काढण्यात आले. संत-महंत आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीने नांदेड नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती. शहरातील प्रमुख रस्त्यावरून नगर कीर्तन मोदी मैदानावर पोहोचले. या ठिकाणी श्री गुरू ग्रंथ साहिबजी विधिवत विराजमान झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. २४ आणि २५ जानेवारी, असे दोन दिवस हिंद-दी-चादर शाहिदी समागम हा कार्यक्रम होणार आहे. देशभरातून आलेल्या भाविकांनी नगर कीर्तन व लंगरचा लाभ घेतला. समाजसेवेही संघटनांकडून सेवा दिल्या जात आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेडमध्ये येणार
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह हे २५ जानेवारी रोजी नांदेडात हिंद-दी-चादर श्री गुरू तेगबहादूर साहिब यांच्या ३५० व्या शाहिदी समागम कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. दुपारी ३ वाजता मोदी मैदान येथे त्यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला ते हजेरी लावतील.