Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:42 IST2026-02-02T13:40:35+5:302026-02-02T13:42:32+5:30
अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत

Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज
गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): नांदेड-हदगाव मार्गावर आज सकाळी ९ वाजता एका कारचा भीषण अपघात झाला आहे. अर्धापूर शहराजवळील एका मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगातील कार (MH-26 AK 4956) अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. या भीषण धडकेत विजय खंदारे (वय ४५, रा. साप्ती) यांचा जागीच मृत्यू झाला असून, एका अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत.
कार नांदेडकडून हदगावकडे जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्रभारी विजय पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेंद्राचार्य संस्थान आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमींमध्ये ऋतुजा कांबळे (२४), आरोही पंडित (१०), आदर्श खंदारे (२२) आणि एका अडीच महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दुसरा अपघात टाळण्यासाठी नागरिकांची तत्परता
अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते. त्यामुळे इतर गाड्या घसरून अपघात होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांनी त्यावर तातडीने माती टाकून रस्ता साफ केला. जरार आहमद, सलिम माणिकपेठे यांच्यासह अनेक तरुणांनी यावेळी माणुसकीचे दर्शन घडवत मदतकार्य केले. हा अपघात नेमका टायर फुटल्याने झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्याने, याचा तपास पोलीस करत आहेत.