Nanded: क्रूरतेची सीमा! एकाच कंटेनरमध्ये ५२ रेड्यांची अवैध वाहतूक; तीन आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 19:33 IST2025-11-11T19:32:38+5:302025-11-11T19:33:57+5:30
या धडक कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Nanded: क्रूरतेची सीमा! एकाच कंटेनरमध्ये ५२ रेड्यांची अवैध वाहतूक; तीन आरोपी ताब्यात
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड):नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्डी (म.ये) टोलनाकाजवळ मंगळवारी दुपारी पोलिसांनी एका १० टायरी ट्रकमधून अवैध पशू वाहतूक उघडकीस आणली आहे. या कंटेनरमधून तब्बल ५२ रेड्यांची क्रूरपणे, विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. या धडक कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना संशयितरित्या जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या पथकाने तात्काळ पार्डी टोलनाकाजवळ सापळा रचला. क्रूरता: कंटेनर (क्र. के.ए.०१ ए.एम.८५३६) थांबवून तपासणी केली असता, त्यात ५२ रेडे आढळून आले. विशेष म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त आणि अतिशय निर्दयपणे जनावरे क्रूरपणे कोंबून वाहतूक केली जात होती. जनावरांची काळजी घेण्यात कसूर केल्याचे यावेळी दिसून आले. या कारवाईत सुमारे १५ लाख रुपये किमतीचे ५२ रेडे आणि ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तिघे आरोपी ताब्यात
पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात असलेले आरोपी: चालक इरशात पि. इसाक (वय ३३, रा. मेवात, हरियाणा), सुफियान जान मोहम्मद (वय २६, रा. बागपत, उत्तरप्रदेश) आणि हन्नी जान महम्मद (वय २५, रा. मेवात, हरियाणा) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.