नांदेड हादरले! धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; तरुणाचा जागीच मृत्यू, ATS कडून तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:31 IST2026-03-21T17:30:28+5:302026-03-21T17:31:16+5:30
नांदेडमध्ये एटीएसची एन्ट्री! वाजेगाव परिसरात दुचाकीचा स्फोट की घातपात? पोलिसांचे शांततेचे आवाहन

नांदेड हादरले! धावत्या दुचाकीचा भीषण स्फोट; तरुणाचा जागीच मृत्यू, ATS कडून तपास सुरू
नांदेड : शहरात शनिवारी रमजान ईदचा उत्साह असतानाच वाजेगाव बंधारा परिसरात एका चालत्या दुचाकीचा अचानक भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत दुचाकीवरील तरुण ९० टक्के भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याने तपासासाठी एटीएस आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी ईदनिमित्त शहरातील मुख्य ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव नमाजसाठी जमले होते. या ठिकाणापासून काही अंतरावरच असलेल्या वाजेगाव बंधारा परिसरात सकाळी ९:३० च्या सुमारास एक तरुण दुचाकीवरून जात होता. यावेळी अचानक दुचाकीचा मोठा स्फोट झाला आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले. प्रत्यक्षदर्शींनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, तो तरुण गंभीररीत्या होरपळला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत दुचाकीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने 'दहशतवादविरोधी पथक' आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. पोलिस सध्या तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्वच बाजूंनी तपास करत आहेत.
मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू
दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने आणि मृतदेह ओळखण्यापलीकडे भाजला गेल्याने मृताची ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. पोलिस सध्या दुचाकीच्या क्रमांकावरून आणि इतर पुराव्यांवरून मृताची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका!
वाजेगाव बंधारा परिसरात दुचाकीने पेट घेतल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी संशयास्पद वस्तू आढळल्याने एटीएसमार्फत सर्वच बाजूंनी तपास केला जात आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी.
— सूरज गुरव (अपर पोलिस अधीक्षक, नांदेड)