नांदेडमधील दुचाकी स्फोटाचे 'परभणी कनेक्शन' उघड, एटीएसकडून गोपनीय तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:54 IST2026-03-23T13:53:17+5:302026-03-23T13:54:46+5:30
नांदेडमध्ये दुचाकी जळताना झाले छोटे स्फोट; फटाके होते की स्फोटक पदार्थ? फॉरेन्सिक टीम मैदानात

नांदेडमधील दुचाकी स्फोटाचे 'परभणी कनेक्शन' उघड, एटीएसकडून गोपनीय तपास सुरू
नांदेड : शनिवारी ईदच्या पवित्र दिवशी वाजेगाव बंधारा परिसरात दुचाकीला लागलेल्या आगीत एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, प्राथमिक तपासात या घटनेचे धागेदोरे परभणी जिल्ह्याशी जोडले जात आहेत. जळणारी दुचाकी आणि त्यातून होणारे छोटे-मोठे स्फोट यामुळे हे प्रकरण केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न होता का? या दृष्टीने ‘एटीएस’सह स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे.
शनिवारी सकाळी वाजेगाव बंधारा परिसरात एका दुचाकीला भीषण आग लागली. यावेळी जवळच असलेल्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधव प्रार्थनेसाठी जमले होते. आगीच्या ज्वाळा इतक्या भीषण होत्या की, दुचाकी जळत असतानाच त्यात अनेक छोटे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. धक्कादायक बाब म्हणजे, आगीने वेढलेला तरुण आपला जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळण्याऐवजी पुन्हा पुन्हा पेटलेल्या दुचाकीच्या दिशेनेच जात असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले आहे. त्याच्या या विचित्र वर्तणुकीमुळे गूढ वाढले आहे.
परभणी कनेक्शन आणि पोलिसांची गोपनीयता
पोलिसांनी मयताची ओळख पटविल्याची माहिती समोर येत असली तरी, त्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. ही दुचाकी परभणी जिल्ह्यातील एका तरुणाची असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृत तरुणही परभणीचाच असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळावर काही संशयास्पद वस्तू आढळल्याने एटीएस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
फटाके की स्फोटक पदार्थ?
दुचाकी जळत असताना झालेले स्फोट हे पेट्रोल टाकीचे होते की त्या तरुणाजवळ काही फटाके किंवा इतर स्फोटक पदार्थ होते, याचा शोध आता फॉरेन्सिक टीम घेत आहे. संवेदनशील वेळी घडलेल्या या घटनेमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.