नायब तहसीलदारांचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:46 IST2019-03-03T00:45:33+5:302019-03-03T00:46:06+5:30
शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

नायब तहसीलदारांचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले
नांदेड : शहरातील बह्यामसिंगनगर येथे घरासमोर अंगणाची स्वच्छता करीत असताना चोरट्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार उषा इजपवार यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
बह्यामसिंगनगर येथे उषा इजपवार या २५ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे आपल्या ‘ओंकार निवास’ या घराच्या अंगणाची स्वच्छता करीत होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका इसमाने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. इजपवार यांनी आरडाओरड केली असता चोरटा पळून गेला.
याप्रकरणी नायब तहसीलदार इजपवार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, चेन चोरीच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या असून महिलांनी पहाटे फिरायला जाताना तसेच कार्यक्रमाला जाताना दक्षता घेण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली आहे.