‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 13:51 IST2025-07-09T13:51:02+5:302025-07-09T13:51:21+5:30
दुर्दैवी मृत्यूच्या वेदनेतून अवयवदानाने दिली आशा; नांदेडच्या पंडित काळे यांचा हैद्राबादेत ग्रीन कॉरिडॉर

‘माझा मुलगा इतरांमध्ये जिवंत राहील’; शेतकरी पित्याचा मोठा निर्णय, मृत मुलाचे अवयवदान
नांदेड : अपघाती मृत्यू झालेल्या तरुण मुलाला शेवटचा निरोप देताना शेतकरी पित्याचे डोळे पाणावले. “मुलाचा मृत्यू सहन होत नाही, पण त्याच्या जाण्यानंतर त्याचे अवयव कुणा गरजूंच्या जीवनात नवप्रकाश घेऊन आले, याचं समाधान आहे,” अशी भावना व्यक्त करून आपण समाजाचे देणे लागत असल्याचे दायित्व काळे कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगीही पार पाडले.
शेतकरी कुटुंबातील पंडित व्यंकटराव काळे (वय ४२रा.जुना कौठा, नांदेड) यांचा सासरवाडीकडून गावी परत येत असताना ३ जुलै रोजी डेरला पाटीजवळील पुलावर दुचाकी अपघात झाला होता. जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना नांदेड येथील यशोसाई रुग्णालयात दाखल केले होते. हृदय व अन्य अवयव काम करत असले, तरी मेंदूची संवेदना जाणवत नसल्याचे डॉक्टरांनी नातेवाइकांना सांगितले. मुलगा ब्रेनडेड झाल्याचे मान्य करणं काळे कुटुंबीयांसाठी अत्यंत अवघड ठरत होते. आशेचा शेवटचा किरण म्हणून नातलगांनी पंडित यास उपचारासाठी हैद्राबाद येथे एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार करूनही प्रकृती सुधारणार नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले, तसेच अवयवदान केल्यास अन्य व्यक्तींच्या माध्यमातून मुलगा जिवंत असल्याची अनुभूती होईल, असा सल्ला समुपदेशकांनी दिला. त्यावर मरणोत्तर अवयदानाबाबत पंडित जागरूक होता, तसेच अपघाती अथवा अकाली निधन झाल्यास वापरायोग्य अवयव दान करावेत, अशी त्याची इच्छा असल्याचे सांगून शेतकरी असलेल्या या कुटुंबाने ग्रीन कॉरिडॉरसाठी अनुकूलता दर्शविली.
धाडसी निर्णय अनेकांसाठी प्रेरणास्रोत
६ जुलै रोजी सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यावर, ७ जुलै रोजी सकाळी विशेष डॉक्टरांच्या टीमने हृदय, दोन्ही किडनी, यकृत (लिव्हर), फुप्फुस यांचे संकलन केले. या अवयवांना वेळेत योग्य रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. पंडित काळेंच्या मरणोत्तर योगदानातून देशातील विविध ठिकाणी अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळाली. त्यानंतर, सोमवारी रात्री उशिरा नांदेड येथे पंडित काळे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत, पंडित काळेंना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. काळे कुटुंबाने घेतलेला हा धाडसी निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत असून, अवयवदानाबाबत जनजागृतीचे आणि विचारप्रवृत्त होण्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधान
तरुण मुलाचे अकाली निधन होईल, असे वाटले नव्हते. घटना दुर्दैवी असली, तरी जड अंतःकरणाने सत्य स्वीकारले. मरणोत्तर अवयवदानाच्या माध्यमातून पंडित भविष्यातही जगात कायम राहणार आहे. मुलाच्या जाण्याने आयुष्याची पोकळी कायम राहणार आहे. मात्र, आयुष्यभर ज्याने समाजाची सेवा केली आणि मृत्यूनंतरही तो गरजू, व्याधींनी ग्रासलेल्या अनेकांना जीवदान देऊन गेल्याचे समाधान असल्याची भावना शेतकरी असलेले पंडितचे वडील व्यंकटराव काळे यांनी व्यक्त केली.