शेतमजुराच्या खुनाचा झाला उलगडा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 19:34 IST2020-07-09T19:34:18+5:302020-07-09T19:34:53+5:30
घटना घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली.

शेतमजुराच्या खुनाचा झाला उलगडा; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला काटा
उमरी (जि. नांदेड) : बल्लाळ येथील मारुती गाडेकर या तरुणाच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, त्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.
ही घटना ६ जुलै रोजी घडली होती. मारुती गंगाराम गाडेकर (३४) हा गावातीलच मोहन श्रीखंडे यांच्या शेतात मजुरीने कामाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी शेतात जाऊन शोध घेतला. श्रीखंडे यांच्या शेतालगत त्याचे प्रेत आढळून आले. उमरी पोलिसांनी त्यांची पत्नी आशाबाई व तिचा प्रियकर गोविंद भीमराव जाधव या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले.
घटना घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याकडून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, ते तपासाला प्रतिसाद देत नव्हते. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी पोपटासारखे बोलू लागले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला़ अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याच्या कारणावरून दोघांनी मारुतीचा रुमालाने गळा आवळून खून करून शव झुडपात टाकले होते.