महागडे कीटकनाशक वापरूनही सोयाबीनमध्ये तण अधिक; शेतकऱ्याने ४ एकर पिक केले जनावरांच्या स्वाधीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 18:29 IST2022-09-14T18:28:35+5:302022-09-14T18:29:04+5:30
व्हिडीओ झाला व्हायरल, अनेकांनी शेतकऱ्यास धीर देत शासकीय मदतीची मागणी केली आहे.

महागडे कीटकनाशक वापरूनही सोयाबीनमध्ये तण अधिक; शेतकऱ्याने ४ एकर पिक केले जनावरांच्या स्वाधीन
बालाजी हिवराळे
आरळी ( नांदेड) : महागडे बियाणे पेरुन, अनेकदा फवारणी, निंदण, खुरपणी करुनही सोयाबीनपेक्षाही तण मोठे झाले. लागवडीचा खर्च सुद्धा निघणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हतबल झालेल्या बिलोली तालुक्यातील खपराळा गावच्या शेतकऱ्यांने चक्क सोयाबीन पीक कापून जनावरांना टाकले. याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला.
खपराळा येथिल महिला शेतकरी जनाबाई हिवराळे यांनी ४ एक्कर शेतीत १४ हजारांचे रुपयांचे महागडे बियाणे, ५ हजारांचे खत आदीची पेरणी केली. निसर्गाचा कोप शेतकऱ्याच्या पाचविला पुंजलेला आहे. यंदाही हंगामात तीन वेळा पेरणी करावी लागली. पिके ऐन बहरण्याच्या वेळी पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पीकांची वाढ खुंटली तर आता अचानक मुसळधार पावसाने सोयाबीनपेक्षा तण अधिक वाढले. यामुळे लागवडीचा खर्च देखील निघणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हतबल शेतकऱ्याने सर्व सोयाबीन कापून जनावरांच्या स्वाधीन केले. अनेकांनी शेतकऱ्यास धीर देत शासकीय मदतीची मागणी केली आहे.