नांदेड : हैदराबाद विभागातील रोलिंग ब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्यांवर परिणाम झाल्याने मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्स्प्रेस (१७६८७) ही गाडी १५ डिसेंबरपर्यंत नांदेड ते धर्माबाद स्थानकादरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे गाडी क्रमांक (१७६८८) धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस ही गाडी १६ डिसेंबरपर्यंत धर्माबाद ते नांदेड मार्गावर अंशत: रद्द करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
दौंड-निझामाबाद डेमू ही गाडीदेखील १५ डिसेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली आहे. ११४०९ क्रमांक असलेली ही गाडी मुदखेड ते निझामाबाददरम्यान अंशत: रद्द राहील, तर निझामाबाद-पंढरपूर डेमू (०१४१३) ही ट्रेन निझामाबाद ते मुदखेडदरम्यान १६ डिसेंबरपर्यंत अंशत: रद्द करण्यात आली आहे. १६ डिसेंबरपर्यंत या गाड्या अंशत: रद्द केल्याने याचा फटका मात्र प्रवाशांना बसणार आहे. दररोज अप-डाउन करणाऱ्या प्रवाशांना आता यामुळे पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. मागील काही महिन्यात दक्षिण मध्य रेल्वे विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे अनेकदा बहुतांश ट्रेन अंशतः तर काही ट्रेन रद्द करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.