माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:21 IST2025-09-27T19:19:40+5:302025-09-27T19:21:36+5:30
मन्याड नदीतील पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प
- शेख शब्बीर
देगलूर (नांदेड): नांदेड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग शनिवारी दुपारपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. उर्ध्व माणार आणि निम्न माणार हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मन्याड नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी देगलूर तालुक्यातील टाकळीजवळ थेट मुख्य रस्त्यावरून वाहत असल्याने हा महामार्ग ठप्प झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
१ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उर्ध्व मानार धरणाचे ११ दरवाजे प्रत्येकी २ मीटरने आणि ४ दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणातून सुमारे ८४ हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निम्न मानार प्रकल्पातील पाण्याचा प्रवाह मिळून हा एकत्रित विसर्ग १ लाख २ हजार क्युसेकपेक्षा अधिक झाला आहे. मन्याड नदीच्या पाण्याच्या बॅक वॉटरमुळे देगलूर तालुक्यातील लिंबा, तूपशेळगाव, कोटेकल्लूर, नंदूर यांसह सात गावांचा संपर्क तात्पुरत्या स्वरूपात तुटला आहे. शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
होमगार्डच्या धाडसाने गंभीर रुग्णाला मदत
या महामार्गावर वाहतूक पूर्णतः बंद असताना, एस. के. रुग्णवाहिका सर्विसचे चालक शेख आमेर गौस मियाँ यांनी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून रुग्णवाहिका चालवत देगलूर येथून एका अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला सुखरूपपणे नांदेडला पोहोचवले. आमेर यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल उपस्थित नागरिक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांचे मोठे कौतुक केले आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करावा
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मन्याड नदीतील पाण्याचा प्रवाह सायंकाळपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता असल्याने हा महामार्ग शनिवार रात्रीपर्यंत खुला होण्याची शक्यता कमी आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.