अर्धापूर-तामसा मार्गावर ओबडधोबड रस्त्यामुळे ३० फूट खोल दरीत रिक्षा कोसळला; ६ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:01 IST2026-02-19T20:01:40+5:302026-02-19T20:01:56+5:30
या भीषण अपघातात एका बालकासह सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.

अर्धापूर-तामसा मार्गावर ओबडधोबड रस्त्यामुळे ३० फूट खोल दरीत रिक्षा कोसळला; ६ प्रवासी जखमी
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (प्रतिनिधी): अर्धापूर-तामसा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी मृत्यूने भीषण झडप घातली. चेनापूर तांडा येथील प्रवाशांना घेऊन जाणारी एक आपे रिक्षा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नियंत्रणाबाहेर जाऊन जुन्या नदीच्या पुलाजवळ सुमारे २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका बालकासह सहा जण जखमी झाले असून, चौघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चेनापूर तांडा येथील प्रवासी रिक्षामध्ये बसून 'लहान' मार्गे अर्धापूरकडे येत होते. जुन्या नदीच्या पुलाजवळ रस्त्याची अवस्था अत्यंत खराब आणि ओबडधोबड असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली रिक्षा थेट ३० फूट खोल खाली कोसळली. रिक्षामध्ये असलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.
देवदूत ठरले शेतकरी आणि रुग्णवाहिका चालक
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि १०८ रुग्णवाहिका, महामार्ग पोलीस रुग्णवाहिका व जगद्गुरु नरेंद्रचार्य रुग्णवाहिकेने तात्काळ धाव घेतली. रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे, संभाजी कल्याणकर, डॉ. रमेश वरवटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. बाजार समितीचे सभापती संजय लहानकर व स्थानिक ग्रामस्थांनीही बचाव कार्यात मोलाची मदत केली.
जखमींची प्रकृती चिंताजनक
जखमींना तात्काळ अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शकुंतला दशरथ पवार (४६), पूजा आकाश चव्हाण (२६) आणि रंजना लक्ष्मण राठोड (३०) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने विष्णुपुरी (नांदेड) येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अन्य जखमींमध्ये रोहन विजय पवार (२५), भुलनबाई दिलीप चव्हाण (५०) आणि एका लहान मुलाचा समावेश असून त्यांच्यावर अर्धापूर येथे उपचार सुरू आहेत.
नागरिकांमध्ये संताप
या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहे. अनेकदा तक्रारी करूनही रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. "रस्त्यामुळे निष्पापांचा बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.