पाण्याच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला; माहूर वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:59 IST2026-03-19T18:58:14+5:302026-03-19T18:59:04+5:30
विहिरीच्या पाण्यात दगडावर बसलेल्या बिबट्याचा थरारक बचाव

पाण्याच्या शोधातील बिबट्या विहिरीत पडला; माहूर वन अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे यशस्वी सुटका
माहूर (जि. नांदेड): माहूर तालुक्यातील गोकुळ गोंडेगाव येथे गुरुवारी पहाटे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना किंवा पाण्याच्या शोधात हा ६ ते ७ वर्षे वयाचा नर बिबट्या शेतकरी शिवम यमजलवाड यांच्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
असे राबवले रेस्क्यू ऑपरेशन
विहिरीत बिबट्या पडल्याचे लक्षात येताच शेतकऱ्याने वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना माहिती दिली. वनविभागाची टीम पिंजरा आणि सुरक्षा साहित्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचली. बिबट्या विहिरीतील एका दगडावर बसलेला होता. दोरीच्या साहाय्याने पिंजरा सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला आणि अवघ्या १५ मिनिटांत बिबट्याला त्यात जेरबंद करण्यात आले. पशुधन विकास अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बिबट्या सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
प्रशासनाचे सहकार्य आणि नागरिकांची गर्दी
बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, मात्र सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी तातडीने 'मॉब कंट्रोल' करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. या मोहिमेत 'हेल्पिंग हँड' या वन्यजीव प्रेमी संघटनेच्या प्रतिनिधींनीही मोलाचे सहकार्य केले. उपवनसंरक्षक मनिषा पाटील आणि सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन पार पडले.