Maharashtra Election 2019 : विनापरवाना प्रचार केल्याने व्हॉटस्अप ग्रूपच्या ११ अ‍ॅडमिनना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 07:58 PM2019-10-12T19:58:18+5:302019-10-12T20:09:23+5:30

निवडणूक विभागाच्या रडारवर सोशल मीडिया

Maharashtra Election 2019: Notice to WhatsApp group admins for non-publicity campaign | Maharashtra Election 2019 : विनापरवाना प्रचार केल्याने व्हॉटस्अप ग्रूपच्या ११ अ‍ॅडमिनना नोटीस

Maharashtra Election 2019 : विनापरवाना प्रचार केल्याने व्हॉटस्अप ग्रूपच्या ११ अ‍ॅडमिनना नोटीस

Next
ठळक मुद्देसोशल मीडियावर संदेश टाकताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यकनिवडणूक विभागाने अ‍ॅडमिनसह ७ उमेदवारांना नोटीस बजावली

नांदेड : सोशल मीडियावर वादग्रस्त तसेच प्रचारकी थाटाचे मेसेज पाठवू नका, अशा वारंवार सूचना देवूनही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने निवडणूक विभागाने आता कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी विनापरवाना सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या अशा १३ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

सोशल मीडियावर निवडणूक विभागाच्या माध्यम प्रामाणिकरण समितीचा वॉच आहे. प्रचारासाठी यूट्यूबचा वापर केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने  १२ व्हॉटसग्रूपच्या अ‍ॅडमिनसह ७ उमेदवारांना नोटीस बजावली होती. याबरोबरच नागरिकांनी सोशल मीडियाचा  वापर प्रचार-प्रसारासाठी करु नये. तसे केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. सोशल मीडियावरील विनापरवाना प्रचाराचा  संपूर्ण खर्च संबंधित उमेदवाराच्या खर्चामध्ये समाविष्ट केल्या जाईल, असेही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गुरुवारी बजावले होते. मात्र त्यानंतरही अनेकजण प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करीत आहेत. त्यामुळेच निवडणूक विभागाने आता कठोर कारवाईस सुरुवात केली असून, शुक्रवारी पुन्हा ११ जणांना नोटीस बजावली आहे. जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियावर निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी जाहिरात व इतर मजकूर टाकायचा असल्यास तो या समितीकडून प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. याबाबतची जाहीर सूचना देवूनही सोशल मीडियावर विनापरवाना प्रचार सुरु असल्याने ही कारवाई केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

शुक्रवारी पूनमताई मित्र ग्रूपचे सदस्य माधव पाटील ढगे, सुनील पाटील चव्हाण व विकास कृष्णुरे, पूनमताई मित्र ग्रूप अ‍ॅडमिन, दत्ता ग्रूप अ‍ॅडमिन, तयारी नायगाव विधानसभेची ग्रूप, प्रदीप पाटील पवळे व साईनाथ शिरपुरे ग्रूप अ‍ॅडमिन, भाजपा सोशल मीडिया नायगाव ग्रूप, होटाळकर गजानन व आकाश पाटील ग्रूप अ‍ॅडमिन-होटाळकर पाटील मित्रमंडळ ग्रूप, चतुरंग कांबळे व इमरान अली ग्रूप अ‍ॅडमिन यासह विवेक मोरे देशमुख यांनाही फेसबूक पोस्टसंदर्भात प्रशासनाच्या वतीने ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सोशल मीडियावर संदेश टाकताना नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषत: निवडणूक काळात ग्रूप अ‍ॅडमिनने आपल्या ग्रूपवर अशा पद्धतीचे संदेश पडणार नाहीत, याबाबत संबंधित सदस्यांना सूचना देणे आवश्यक आहे. प्रचारकी थाटाचा कुठलाही संदेश तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा पद्धतीचे संदेश सोशल मीडियावर टाकू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले असून उर्वरित दिवसांतही कठोर कारवाई  केली जाणार आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Notice to WhatsApp group admins for non-publicity campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.