किनवटकरांची वाहतूक कोंडी फुटणार; रेल्वे अंडरपास सप्टेंबरमध्ये होईल वाहतुकीस खुला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 18:33 IST2025-08-01T18:32:38+5:302025-08-01T18:33:09+5:30
याच अंडरपासच्या पुढे ४०० मीटरवर पाच मीटर रुंदीचा ब्रीज तयार करण्याचा प्रस्ताव

किनवटकरांची वाहतूक कोंडी फुटणार; रेल्वे अंडरपास सप्टेंबरमध्ये होईल वाहतुकीस खुला
किनवट (जि.नांदेड) : वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असलेल्या तीन मीटर रुंदीच्या शिवाजीनगर रेल्वे अंडरपासचे काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला करण्यात येईल, अशी ग्वाही नांदेड दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरएम प्रदीप कामले यांनी किनवट येथे दिली. याच अंडरपासच्या पुढे ४०० मीटरवर पाच मीटर रुंदीचा ब्रीज तयार करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेचा विस्तार आणि मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी प्रदीप कामले हे त्यांच्या वेगवेगळ्या विभागांच्या शाखा अधिकाऱ्यांसह दोन डब्यांच्या विशेष रेल्वेने ३१ जुलै रोजी दुपारी किनवट येथे आले होते. तेव्हा पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नवीन रेल्वे गाड्यांबाबत विचारले असता, आदिलाबाद, किनवट, मुदखेड नांदेड रेल्वे मार्गावर नवीन गाड्यांचे प्रयोजन नसल्याचे त्यांनी सांगितले. फुकट प्रवाशांना आळा घालण्यासाठी तिकीट तपासणीसाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. त्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.