लाच प्रकरणात फरार पोलीस निरीक्षक दिलीप तिडकेची शरणागती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 15:56 IST2019-07-04T15:56:05+5:302019-07-04T15:56:36+5:30
१९ दिवसांनंतर एसीबीपुढे शरणागती पत्करली़

लाच प्रकरणात फरार पोलीस निरीक्षक दिलीप तिडकेची शरणागती
किनवट (जि़ नांदेड) : पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी सहमती दर्शविणारे किनवट पोलीस ठाण्यातील फरार पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी १९ दिवसांनंतर एसीबीपुढे शरणागती पत्करली़ त्यांच्या अटकेने त्या दोन बॅगेत किती रोकड होती? सील लावलेल्या निवासस्थानी काय आहे? याचा उलगडा होणार आहे़
चुलत्याने पुतण्याच्या विरोधात मालमत्ता हडप केल्याची तक्रार किनवट पोलीस ठाण्यात दिली होती़ त्यानंतर पुतण्याच्या विरोधात कारवाई न करण्यासाठी पोनि़ दिलीप तिडके यांनी पोलीस नायक मधुकर पांचाळ यांच्या माध्यमातून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ ती स्वीकारताना १४ जून रोजी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नांदेडच्या ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते़ मात्र ती रक्कम स्वीकारण्यासाठी सहमती देणारे पोनि़ तिडके हे पसार झाले होते़
‘एसीबी’ने पोलीस नायक मधुकर पांचाळ व पोलीस कर्मचारी पांडुरंग बोईनवाड यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याचवेळी पोनि़ तिडके यांच्या निवासस्थानी पैशाने भरलेली एक बॅग होमगार्डच्या मदतीने पळविली जात असताना जागरुक नागरिकांनी पकडली़ त्या बॅगेतून ४ लाख ७२ हजार रुपये जप्त करण्यात आले़ मात्र उर्वरित दोन बॅगा पळविण्यात तिडकेचे हितचिंतक यशस्वी झाले होते़
तिडके यांच्या मागावर एसीबीने दोन पथके नियुक्त केली होती़ याचदरम्यान अटकपूर्व जामीन मिळावा म्हणूनही तिडकेने प्रयत्न केला. मात्र, अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता़ त्यानंतर बुधवारी तिडके हे एसीबीला शरण आले़ तिडके यांना आज किनवट येथे आणण्यात आले होते़ सील लावलेले निवासस्थान एसीबीच्या पथकाने उघडले असून, त्याची झाडाझडती घेण्यात आली़