नात्यांची वीण उसवली; मोबाईलवरून भांडणात मोठ्या भावाने लहान्या भावास संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 20:14 IST2023-06-26T20:14:13+5:302023-06-26T20:14:22+5:30
रागाच्या भरात मोठ्या भावाने लहान भावाचा केला खून

नात्यांची वीण उसवली; मोबाईलवरून भांडणात मोठ्या भावाने लहान्या भावास संपवलं
नांदेड: मोबाईलकरिता एका २३ वर्षीय भावाने त्याच्या २० वर्षीय लहान भावाचा साडीने गळा आवळून खून केल्याची घटना २५ जून रोजी मध्यरात्री गोपाळचावडी येथे उघडकीस आली आहे.
नांदेडच्या सिडको वसाहती शेजारील गोपाळ चावडी येथे वास्तव्यास असलेल्या अर्जुन राजू गवळे याने रविवारी रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास मोठा भाऊ करण राजू गवळे यास मोबाईल मागितला. मात्र, त्याने नकार दिल्याने दोघा भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात करण याने अर्जुनचा साडीने गळा आवळून खून केला, असा आरोप मयत अर्जुन गवळे याचे मामा लक्ष्मण मालोजी वाघमारे (रा. सिध्दार्थनगर, नांदेड) यांनी केला. याप्रकरणी आज वाघमारे यांनी तक्रार दिली असल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदार सपोउपनि. धनंजय देशमुख व मदतनीस माधव स्वामी यांनी दिली आहे.
या घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड व सपोनि. सुरेश थोरात व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोउपनि. विजय पाटील हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.